आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या भरारी पथकाने प्रादेशिक विभागात नोव्हेंबरमध्ये ५ कोटी ३० लाखांची २६२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. वीजचोरीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचोरीच्या प्रकरणात दिलेली दंडाची बिले मुदतीत न भरल्यास संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये वीजचोरी होत असलेल्या ठिकाणी छापे टाकून २६२ वीजचाेरीची प्रकरणे उघडकीस आणली. या प्रकरणात ५१ लाख ३८ हजार युनिटच्या बिलाची आकारणी करण्यात आली. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लातूर मंडळात विविध ठिकाणी वीजचोरीची मोहीम हाती घेतली. वीजचोरीच्या रकमेची बिले भरण्यासाठी ग्राहकांना मुदत दिली आहे. या वीजचोरीच्या प्रकरणातील देयकांचा भरणा निर्धारित वेळेत न केल्यास संबंधितांविरुद्ध विद्युत अधिनियम २००३ नुसार कडक कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला.
विविध कलमांद्वारे हाेताे दंड विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे आदींचा समावेश होतो. कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मीटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे आदींचा समावेश होतो. विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार वीजचोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
वीजचोरी पकडण्यावर अधिक भर देणार आगामी काळात वीजचोरीविरोधात मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोधमोहीम राबवण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांनी दिले आहेत. विभागाचे उपसंचालक सतीश कापडणी व अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश शिंपी यांनी मोहीम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यापुढे घरगुती ग्राहकांची वीजचोरी पकडण्यावर अधिक भर देणार असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.