आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायाचे आमिष:वृत्तपत्रांना कागद पुरवणाऱ्यास मुंबईच्या कंपनीकडून 5 कोटी 22 लाखांचा गंडा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध वृत्तपत्रांना कागद पुरवणाऱ्या व्यावसायिकाला मुंबईच्या कंपनी व्यवस्थापकाने तब्बल ५ कोटी २२ लाख ६४ हजार ९३९ रुपयांचा गंड घातला. सुरुवातीला कागद पुरवठ्याचे आश्वासन देऊन नंतर डाळीच्या व्यवसायात उतरण्यास सांगून वर्षभरात कोटींचा माल घेऊन आराेपी मोबाइल बंद करून फरार झाले. याप्रकरणी मुंबईच्या पोदार ग्लोबल प्रा. लि. चा व्यवस्थापक निशित किशनकुमार बजोरिया याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला.

सेव्हन हिल्स येथील विद्यानगरात राहणारे मनीषकुमार मदनलाल चेचाणी यांचा भाग्यश्री पेपर्स नावाने कागद पुरवठ्याचा व्यवसाय आहे. ते विविध कागदांच्या कंपन्या व डीलर्सकडून कागद खरेदी करून वर्तमानपत्रांना विक्री करतात. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून मुंबई व दिल्ली येथे कार्यालय असलेल्या पोदार प्रा. लि. या कंपनीसोबत व्यवसाय करतात. बजोरिया त्याचे सर्व कामकाज पाहतात. २०१८ पासून त्यांचे या कंपनीसोबत संबंध असल्याने त्यांचा विश्वास हाेता. मे २०२१ मध्ये बजाेरिया यांनी पोदार ग्लोबलऐवजी नवीन फर्म परफेक्सो इनोव्हेशन या नावाने व्यवसाय करावा लागणार असल्याचे सांगितले. चेचाणी यांनी कुठलीही शंका न घेता बजाेरियाच्या सांगण्यानुसार व्यवहार सुरू ठेवला. २० व २१ मे २०२१ रोजी ३ कोटी रुपये दिले. त्यापैकी २ कोटी २६ लाख ९४ हजार ५९२ रुपयांचा माल पुरवठा करण्यात आला. उर्वरित ७३ लाख ५ हजार ४०८ रुपयांचा माल दिला नाही. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये १ कोटी १० लाख रुपये टीडीएस वजा करून अॅडव्हान्स दिले. असे एकूण १ कोटी ८३ लाख ५ हजार ४०८ रुपये चेचाणी यांनी दिले. मात्र, शिल्लक रकमेच्या कागदाचा पुरवठाच झाला नाही.

३ काेटी ३९ लाखांची डाळ घेतलीच नाही : पाेदार ग्लोबल कंपनीने डाळीचा पुरवठा सुरू केला. त्या व्यवसायातही नवीन फर्मद्वारेच व्यवहार करावा लागेल, असे सांगत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे आमिष दाखवले. ७ फेब्रुवारी रोजी बजोरियाच्या सांगण्यावरून चेचाणी यांनी डाळी खरेदी करून विविध कंपन्यांसोबत खरेदी-विक्री सुरू केली. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात चेचाणी यांनी त्याला ३ कोटी ३९ लाख ५९ हजार ५३१ रुपयांचा माल देऊ केला. मात्र, नंतर बजाेरिया मोबाइल बंद करून फरार झाला. त्यांनी त्याच्या कार्यालयात जाऊन पाहिले असता ते बंद झाल्याचे आढळले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...