आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुसफूस:एमआयएमचे 5 हजार कार्यकर्ते कार्यकारिणी नसल्याने अस्वस्थ; गटबाजीमुळे 50 दिवसांपूर्वी बरखास्ती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ मराठवाडाच नव्हे तर देशभरात बहुचर्चित असलेल्या एमआयएम पक्षाची शहर, जिल्हा कार्यकारिणी १३ जून रोजी बरखास्त करण्यात आली. ५० दिवस उलटून गेले तरी नव्या कार्यकारिणी स्थापनेची हालचाल नसल्याने सुमारे ५०० इच्छुक पदाधिकारी आणि प्रत्येकाचे दहा समर्थक अशा पाच हजार जणांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

पदच नाही तर कोणत्याही आंदोलनात जोश आणून लढणार कसे, असा त्यांचा दबक्या आवाजात सवाल आहे. नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीमधून बाहेर पडणारे पदाधिकारी एमआयएममध्ये प्रवेश करून महत्त्वाची पदे बळकावतील, अशीही भीती त्यांना वाटत आहे. तर कार्यकारिणीतील पद काढून घेतले, पण कार्यकर्ता म्हणून आक्रमक आंदोलन करण्यापासून कुणालाही रोखलेले नाही, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथे नव्या कार्यकारिणीची यादी अडकली आहे. तेथून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय हालचाली होणार नाहीत.

२०१५मध्ये एमआयएमने मनपामध्ये जोरदार धडक मारत २५ वॉर्डांतून विजय मिळवला. काँग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या. तत्पूर्वी २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील आमदार, २०१९मध्ये खासदार, प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली. तरीही काही जणांनी थेट हैदराबादेत ओवेसी यांच्यामार्फत पक्षात प्रवेश, पदही मिळवले. त्यानंतर इम्तियाज यांचे आदेश डावलून काही ठिकाणी वेगळीच आंदोलने सुरू झाली. त्यावर जाब विचारल्यावर गटबाजी वाढली. त्यामुळे इम्तियाज यांनी १३ जून रोजी कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली.

औरंगाबादेत गटबाजीमुळे ५० दिवसांपूर्वी बरखास्ती
नामांतरविरोधी लढ्यावर परिणाम

दर आठवड्याला एमआयएमचे नागरी समस्या, राज्य किंवा राष्ट्रीय प्रश्नावर आंदोलन होत होते. १३ जूननंतर त्यांचा वेग थंडावला. नामांतरविरोधी मोर्चातही अपेक्षित गर्दी नव्हती. त्यामागे एक कारण कार्यकारिणी बरखास्तीचे होते, असेही राजकीय वर्तुळात म्हटले जाते.

एक व्यक्ती एक जबाबदारी
हैदराबादप्रमाणे औरंगाबादेत ‘एक व्यक्ती एक जबाबदारी’ असे धोरण अमलात आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पक्षातील पदांवर काम करणाऱ्यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही, अशीही एमआ‍यएममध्ये चर्चा आहे.

मनपा निवडणुकीपूर्वी सर्व काही व्यवस्थित होईल : खा. इम्तियाज
याविषयी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, केवळ पक्षात अंतर्गत गटबाजी वाढल्याने कार्यकारिणी बरखास्त केली आहे. योग्य कार्यकर्त्यांची निवड करून मनपा निवडणुकीपूर्वी कार्यकारिणी स्थापन करण्यात येईल. पद नसल्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. लोकांच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलने सुरूच राहतील.

बातम्या आणखी आहेत...