आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या लेखी परीक्षेला २ मार्चपासून सुरुवात होत आहे. विभागातून ६२९ केंद्रांवर १ लाख ८०,२१० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ६३ परीक्षक केंद्रे नेमण्यात आली आहेत. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ५० भरारी पथकांची नियुक्ती केली असून, केंद्रप्रमुखांनाही सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अर्धा ते एक तास आधी केंद्रावर पोहोचावे तसेच उत्तरपत्रिकांवर दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित वाचन करून त्याचे पालन करावे, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.
भरारी व बैठ्या पथकांची राहणार करडी नजर : परीक्षेत काेणताही गैरप्रकार घडू नये यासाठी महसूल विभागाची १० भरारी पथके, तर ३३ बैठी पथके असून, ६ शिक्षण विभागाची भरारी पथके असतील. प्रत्येक केंद्रावर ३ जणांचे बैठे पथक असून ते परीक्षेच्या एक तास अगाेदर आणि परीक्षेनंंतर एक तासाने निघून जातील. यासाठी महिलांचेही एक स्वतंत्र पथक तैनात केले आहे.
केंद्राजवळील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहतील सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षा सूचीची नियमावली वाचून दाखवत आपल्या केंद्रावर कॉपी होणार नाही, कॉपी सापडणार नाही याची दक्षता घ्या. नियमांचे काटेकोर पालन करा. ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचे शिक्षक आणि ज्यांचा परीक्षेशी काहीही संबंध नाही असे लोक केंद्रावर असणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहतील. जिथेे इतर वर्ग भरतात, अशा परीक्षा केंद्रांनी परीक्षेच्या वेळेत इतर वर्ग भरलेले असणार नाहीत याचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
पाच जिल्ह्यांत ४७ उपद्रवी केंद्रे परीक्षेसाठी ३० जानेवारी रोजी २०० शाळांनी अतिरिक्त विद्यार्थी संख्या कळवली होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने बैठक घेऊन वारंवार सूचित केले होते की, विद्यार्थी संख्या आणि बैठक क्षमतांची माहिती कळवा. त्यानंतर जिल्ह्यात दहा ते बारा उपकेंद्रे विद्यार्थी संख्येनुसार करण्यात आली. यात विभागात ४७, तर जिल्ह्यात १७ केंद्रे उपद्रवी आहेत.
तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्या कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरे जावे. त्याची बोर्डाने सर्व तयारी केली आहे. परीक्षेचे सर्व साहित्य वितरित केले आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेच्या अर्धा तास अगोदर पोहचावे, हॉलतिकीट आणि ओळखपत्र सोबत ठेवावे. -अनिल साबळे, अध्यक्ष, एसएससी बोर्ड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.