आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या मुलांच्या फिरत्या शाळेला 50 लाख मंजूर:महिला व बालविकास मंत्रालय राबवणार योजना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादसह देशातील काही शहरांत रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांच्या शिक्षण, संगोपनाची काळजी घेतली जाते. त्यासाठी केंद्र शासनाचा निधी मिळतो. हीच योजना महाराष्ट्रातही अमलात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा शहरांसाठी पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार असून त्याकरिता ५० लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.

मोठ्या शहरांमध्ये उड्डाणपुलांखाली किंवा रस्त्यांवर भटकणारी शेकडो मुले दिसतात. पालकांचे लक्ष नसल्याने ही मुले शाळेत जात नाहीत. म्हणून काही स्वयंसेवी संस्थांनी फिरत्या शाळांची संकल्पना राबवली. यामध्ये मुलांना आकर्षित करेल अशी एक बस शाळेच्या वर्गात रूपांतरित केली जाते. त्यात बसून मुले शहरभर फिरता फिरता नाच, गाणी शिकतात. अंकगणिताचे धडे गिरवतात. साधारणत: सहा महिन्यांत या मुलाला शाळेची गोडी लागू शकते आणि ते अंगणवाडीत जाऊ शकते. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर, ठाणे येथे हा उपक्रम लागू करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.

या संदर्भात विभागाचे सहसचिव शरद आहिरे यांनी जारी केलेल्या आदेशात काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार रस्त्यावर भटकणाऱ्या सहा वर्षे वयाखालील मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनेच हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यात बालविकास विभागाने मुलांना आवडेल, त्यांचे मन रमेल अशी आकर्षक बस किंवा व्हॅन तयार करायची आहे. दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वच्छ, ताजे रुचकर अन्न मिळेल, याची खबरदारी महिला व बालविकास अधिकाऱ्याला घ्यावी लागणार आहे. मुलाची वैयक्तिक स्वच्छता, नखे कापणे, इतर स्वच्छतेची जबाबदारी स्वयंसेवी संस्थेवर राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही बस फिरत राहील. प्रत्येक बस, व्हॅनमध्ये एक समुपदेशक, एक शिक्षक, एक काळजीवाहक आणि एक वाहनचालक एकत्रित मानधन तत्त्वावर नियुक्त करावा लागेल. या साऱ्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...