आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांपर्यंत वाढ! कृषी हवामान सल्ल्यानुसार केलेल्या बदलांचा फायदा

अजय कुलकर्णी | औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॅशनल मान्सून मिशनचे यश, एनसीएईआरच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; २.२ कोटी शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय कृषी हवामान सल्ला

वेळेवर दिलेला अचूक हवामानविषयक सल्ला शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकू शकतो. पृथ्वीविज्ञान मंत्रालय व नॅशनल काैन्सिल आॅफ अप्लाइड इकाॅनामिक रिसर्चच्या (एनसीएईआर) एका सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. देशाच्या नॅशनल मान्सून मिशनवरील गुंतवणुकीसंदर्भात हा सर्व्हे करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांनी सरकारी कृषी हवामान सल्ल्यानुसार आपल्या पीक पद्धतीत बदल केले त्यांचे उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) हे देशातील २२ दशलक्ष शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय कृषी हवामान सल्ला पाठवतात. त्या भागातील हवामानानुसार पेरणी, पिकांचे वाण, खत वापर, कीटकनाशक फवारणी कधी, केव्हा करायची याचा सल्ला यातून वेळोवेळी दिला जातो. या सल्ल्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीकपद्धतीत बदल केले त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

एनसीएईआरने केलेल्या या सर्वेक्षणात देशातील ११ राज्यांतील १२१ जिल्ह्यांतील ३९५६ शेतकऱ्यांचा सहभाग होता. या सर्वेक्षणानुसार, ज्या शेतकऱ्यांनी कृषी हवामान सल्ल्यातील नऊ निकषांनुसार आपल्या शेतीत बदल केले त्यापैकी ९४ टक्के शेतकऱ्यांचे उत्पन्न तरी वाढले किंवा त्यांचे नुकसान टळले.

असे वाढले उत्पन्न

हवामान सल्ल्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केले त्यांचे उत्पन्न वाढल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे एनसीएईआरच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. एनसीएईआरच्या मते, ज्यांनी सल्ला मानला नाही व काहीच बदल केले नाहीत त्यांचे उत्पन्न १.९८ लाख रुपये झाले. तर ज्यांनी नऊ कृतींपैकी एक ते चार बदल केले त्यांचे उत्पन्न २.४३ लाख रुपयांवर गेले. ज्यांनी पाच ते आठ बदल केले त्यांचे उत्पन्न २.४५ लाख रुपये झाले. ज्या शेतकऱ्यांनी हवामान सल्ल्यातील सर्व म्हणजे नऊ बदल केले त्यांचे वार्षिक उत्पन्न ३.०२ लाख रुपये झाले.

कृषी हवामान सल्ल्यातील ९ कृती

आयएमडी आणि आयसीएआर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या कृषी हवामान सल्ल्यात नऊ कृतींबाबत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो. त्या नऊ कृती अशा - पिकांचे वाण बदलण्याचा सल्ला, हवामानानुसार कापणीचे धान्य साठवणे, हवामानानुसार कापणी, काढणी लांबवणे, पेरणीच्या वेळेबाबत सल्ला, जमीन नांगरण्याबाबत सल्ला, कीटकनाशक वापरासंबंधी सूचना, खत वापराबाबतचे वेळापत्रक, सिंचनाच्या वेळा अशा प्रकारचा सल्ला दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळण्यास मदत झाल्याचे व उत्पन्नात भर पडल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...