आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या पाणीपट्टीत 50 टक्के कपात:पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा; भाजप नेते म्हणाले -आमच्या आंदोलनामुळेच घेतला निर्णय

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीत 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. समाधानकारक पाणी मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचेही त्यांनी आज औरंगाबादेत सांगितले. त्यामुळे आता औरंगाबादकरांना समाधानकारक पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टी चार हजार रुपयांऐवजी​​​​​​ दोन हजार रुपये करण्याच्या सूचनाही महापालिका प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी भाजपच्या आंदोलनामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या होण्याऱ्या मोर्चाच्या भितीमधून पाणीपट्टी कमी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

शहरातील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात आठ तर काही ठिकाणी दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. जसे पाणी मिळते तशी पाणीपट्टी असावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. भर उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरिक मोर्चे काढत आहे.

पाण्यासाठी समन्वय समिती

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून या समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री देसाई यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मोर्चा मुळेच पाणी पट्टीत कपात - शिवाजी दांडगे

शहरातील सिडको, हडकोसह अनेक परिसरात आठवड्यातून एक वेळा तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणी मिळते. यावर भाजपने काही परिसरात पाणी मुद्दामुन उशिरा येते असा आरोप केला होता. तर केवळ देंवेंद्र फडणवीस औरंगाबादेत येणार म्हणून आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी केला आहे.

भाजपचा 23 तारखेला मोर्चा

भाजपकडून औरंगाबादच्या पाणी प्रश्नासंदर्भात 23 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करा. अशी मागणी भाजपकडून करण्यात येणार आहे. यावर देसाई म्हणाले की, शहरातील प्रशासन चांगले काम करत आहे. शहरात पाण्यासंदर्भात प्रामाणिक काम सुरु आहे. फडणवीस यांनी माहिती घ्यावी, अधिकाऱ्यांनीही त्यांना पाणीपुरवठ्याबद्दल माहिती द्यावी असे देसाई यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...