आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचे हाल:सरकारने पदनिर्मितीच रोखल्याने तलाठ्यांच्या 5 हजार जागा रिक्त; तीन वर्षांपासून पदभरती ठप्प

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामसेवकाकडे लोकांची नित्यनेमाची कामे असतात. पण राज्य शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून तलाठ्यांची पदे भरली नाहीत. एका तलाठ्याकडे तीन-चार सज्जांचा अतिरिक्त कारभार दिल्याने त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली. सन २०१६ ते २०१९ दरम्यानच्या या चार वर्षांत ही पदे भरायची होती. पण, सरकारने या पदांना मंजूरी न दिल्याने पदभरती होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या राज्यात ५ हजार तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.

तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांच्या कामांवर त्याचा परिणाम होत आहे तसेच अनेक तलाठ्यांकडे अतिरिक्त कामामुळे त्याच्या कामावर परिणाम होत आहे, असे तलाठी संघटना अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात एका तलाठ्यावर तीन ते चार गावांचा भार

तीन वर्षांपासून पदभरती ठप्प

राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरिकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने ३ हजार १६५ नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदांच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात ३१६५ पदांना मंजुरी दिली. दरवर्षी २० टक्क्यांप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तीन वर्षांपासून पदभरती झाली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट आले. तेव्हा ग्रामीण भागातील शासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी तलाठी भरती करणे शक्य होते. मात्र, न्यायालयीन प्रकरणे, आघाडीतील विसंवाद यामुळे भरती झालीच नाही.

राज्यात १२,६३६
तलाठी संख्या १०,३४०
कार्यरत तलाठी २,२९६
रिक्त जागा ५२८
नव्याने तयार झालेले सज्जे ३,१६५
नवीन सज्जांसाठी तलाठी जागा : ५२८

औरंगाबाद जिल्ह्यात ४२ जागा रिक्त

औरंगाबाद जिल्ह्यात तलाठ्यांच्या ३९१ जागा मंजूर असून त्यापैकी ३४९ जागा भरलेल्या आहेत. सध्या ४२ तलाठ्यांची कमतरता आहे. वाढलेल्या सजांमुळे तलाठ्यांना एकाच वेळी तीन ते चार गावांचा कारभार हाकावा लागत आहे. त्यामुळे कामे खोळंबत आहेत.

कामाचा येतोय अतिरिक्त ताण

तलाठ्यांना महसूलशिवाय इतर विविध कामे दिली जातात. किसान सन्मान योजनेचे काम असो की इतर कुठले काम. ते तलाठ्याला करावे लागते. त्यातच सज्जा निर्मिती वाढली. मात्र पदांची भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तीन ते चार गावांचा पदभार सांभाळावा लागत आहे. अतिरिक्त कामामुळे तलाठ्यांची अडचण होत आहे.-अनिल सूर्यवंशी, अध्यक्ष, राज्य तलाठी संघटना

बातम्या आणखी आहेत...