आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:7.62 लाख ग्राहकांनी थकवले 5,442 कोटी 90 लाख 26 हजारांचे वीज बिल

छत्रपती संभाजीनगर / संतोष देशमुख21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिमंडळात घरगुती, औद्योगिक, कृषी, व्यावसायिक आदी वर्गांतील एकूण साडेतेरा लाख वीज ग्राहकांपैकी ७ लाख ६२ हजार ४७८ ग्राहकांनी ५ हजार ४४२ कोटी ९० लाख २६ हजार रुपये वीजबिल थकवले आहे. यामुळे महावितरण अडचणीत आले आहे. महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बिलाची थकीत रक्कम वसूल करा, अन्यथा कामात कसूर केला म्हणून कारवाई केली जाईल, असा थेट इशारा दिला आहे.

महावितरण उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदी करते व ग्राहकांच्या घर, शेत, उद्योग, व्यवसाय, पाणीपुरवठा, पथदिवे आदीपर्यंत सुरक्षित व अखंडित पोहोचवण्यासाठी २४ तास प्रयत्नशील असते. युनिटच्या स्लॅबनुसार विजेचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. दरमहा वापरलेल्या युनिटनुसार ग्राहकांनी त्याचा नियमित भरणा करणे अनिवार्य आहे. मात्र, ५० टक्के ग्राहक वीजबिलाचा भरणाच करत नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहर, ग्रामीण व जालना असे छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील थकबाकीची रक्कम पाच हजार ४४२ कोटी ९० लाख २६ हजार रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचली आहे.

त्यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. वीज खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे वेतन करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन ग्राहकांपर्यंत वीज पोहोचवणे असे अनेक प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांना तारेवरची कसत करावी लागत आहे. थकीत रक्कम वसूल केल्याशिवाय तोरणोपाय नसल्याने महावितरणच्या अध्यक्ष सिंघल यांनीच अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम वसूल करा अन्यथा कारवाईला, सामोरे जा. असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

१८ %लागते व्याज, विलंब शुल्कही भरावा लागतो दिलेल्या तारखेच्या आत वीजबिल भरले नाहीत तर विलंब शुल्क,१८ टक्क्यांनी व्याजाचा बोजा वाढतो. त्यानुसार १४६२ कोटी ५२ लाख ९५ हजार व्याजाच्या रकमेची, तर विलंब शुल्क २ कोटी २६ लाख ९८ हजार रुपयांची भर पडली आहे.

फसव्या आश्वासनांमुळे कृषिपंपांची थकबाकी उच्चांकी पातळीवर राजकीय नेते वीजबिल माफीचे अश्वासने देतात. या फसव्या अश्वासनांमुळे छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील कृषिपंपाची थकबाकी ४७२१ कोटी ५८ लाख ६७ हजार रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्याला १,१९१ कोटी २६ लाख ८४ हजार व्याज १७७.७५ लाख रुपये विलंब शुल्कही आहे.

बिल भरा, अन्यथा कनेक्शन कट अध्यक्षांच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी मुख्य अभियंता ते वीज कामगार सर्वच थकीत रक्कम वसुलीसाठी परिश्रम घेत आहेत. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या कारवाईमुळे थकबाकीदार ग्राहकांचीही मोठी अडचण झाली आहे. सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गैरसोयही वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...