आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
या १४ जिल्ह्यांत एकूण ४७,१३९ कोरोनाचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंच्या ८४.१२ टक्के मृत्यू या १४ जिल्ह्यांतील आहेत. कोरोनाचे एक हजाराहून जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांत कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे, प. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा , कोल्हापूर व अहमदनगर हे सहा जिल्हे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव हे दोन जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील नागपूरचा समावेश आहे.
मार्च २०२० ते एप्रिल २०२१ : राज्यातील १४ जिल्ह्यांत कोरोनाचे एक हजाराहून जास्त बळी
- राज्याचा मृत्युदर १.८३ टक्के आहे. या १४ जिल्ह्यांपैकी कोल्हापूर, मुंबई, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा मृत्युदर राज्याच्या मृत्युदरापेक्षा जास्त आहे.
- हजारावर मृत्यू असलेल्या या १४ जिल्ह्यांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांचा मृत्युदर सर्वाधिक ३.३ टक्के आहे. देशाचा मृत्युदर १.३१ टक्के आहे. त्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगलीचा मृत्युदर दुपटीपेक्षा जास्त असून चिंताजनक आहे.
कोरोना मृत्यू : दोनशेपेक्षा कमी मृत्यूंचे राज्यात पाच जिल्हे
राज्यातील पाच जिल्ह्यांनी गेल्या वर्षभरात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी राखण्यात यश मिळवले आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या काळात या पाच जिल्ह्यांत कोरोनामुळे बळींची संख्या २०० पेक्षा कमी आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, सिंधुदुर्ग आणि वाशीम या पाच जिल्ह्यांनी ही कामगिरी साधली आहे. गडचिरोली हा राज्यात सर्वात कमी कोरोना बळी असलेला जिल्हा आहे. गडचिरोलीत आजवर कोरोनाने ११० जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.