आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:आठ दिवसांत 5 हजार 746 क्विंटल कांद्याची आवक, निर्यातबंदीमुळे सरासरी 300 रुपयांनी दर घसरले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ ते १५ सप्टेंबर दरम्यान ५ हजार ७४६ क्विंटल आवक झाली. ९ सप्टेंबर रोजी सर्वात कमी ११० रुपये क्विंटल दराने तर १२ सप्टेंबर रोजी विक्रमी २५०० रुपये क्विंटल कांद्याला दर मिळाला. किरकोळ बाजारात कांदा २० ते ३० रुपयापर्यंत विक्री होऊ लागला. दर उच्यांक पातळीवर जाऊन कांदा डोळ्यात पाणी आणणार याचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी लादली आहे. त्यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरात सरासरी तीनशे रुपयांनी घसरण झाली. यामुळे उत्पादक संताप व्यक्त करत असून राजकारणही तापले आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ च्या चौथ्या आठवड्यापर्यंत कांद्याला विविध बाजारपेठेत १० हजार रुपयापर्यंत विक्रमी दर मिळाला होता. उन्हाळ्यात कांद्याची ३ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. पण कोरोना व्हायरसने जगात हाहाकार उडवून दिला. बाजारपेठ ठप्प झाल्या होत्या. त्यात उन्हाळ्यातील कांद्याची आवक वाढली व बाजारात उठाव नसल्याचे कारण देत विक्रेत्यांनी अत्यल्प २०० ते ९०० रुपये दराने खरेदी सुरु केली होती. किरकोळ बाजारात कांदा ८ ते १० रुपये किलोदर निचांक पातळीवर आले होते. यंदा अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे खरीपातील कांद्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्ता दर्जावर काही परिणाम झाला आहे. मात्र, सर्वत्र बाजारपेठ सुरु आहे. हॉटेल, खानावळ, आदी व्यवसाय सुरु झाले आहेत. घरोघरी कांदा लागतो. सध्या पुरवठा स्थिर व मागणी वाढली आहे. यामुळे कांद्याच्या कमाल दरात ५०० ते ९०० वरुन थेट १५०० ते २५०० रुपयापर्यंत वाढ झाली होती. उत्पादकांना चांगला दर मिळू लागल्याने आवक वाढू लागली होती. १२ सप्टेंबरला २५०० रुपये विक्रमी दर मिळाल्याने दुसऱ्या दिवशी १३ सप्टेंबर रोजी आवक दुप्पट ५९५ वरून ११६४ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे किमान ते कमाल दर सरासरी तीनशे रुपयांनी घसरून २२०० ते १२००, कमीत कमी २०० रुपयांवर खाली आले. आता तर दर्जेदार कांदा डोळ्यात पाणी आणणार व गल्ली ते दिल्ली ओरड सुरु होईल, अशी स्थिती निर्माण होत चालल्याचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने काल निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे मंगळवारी देखील आवक ४०० क्विंटलने घट व सरासरी तीनशे रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाल्याची नोंद बाजार समिती प्रशासनाने घेतली आहे.

राजकारण तापले

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लागू केल्याने देशभर राजकारण चांगलेच तापले आहे. उत्पादक संतापले असून विविध माध्यमातून ते सरकारला शिव्या घालत आहेत. कांदा जीवनावश्यक यादी नाही. त्यामुळे तात्काळ निर्यात बंदी हटवली नाहीतर आंदोलन छेडले जाईल, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मिडियावर टाकून इशारा संदेश व आक्रोश व्यक्त केला जात आहे.

आत्मनिर्भर भारतात शेतकरी येत नाहीत का?

केंद्र सरकारने कांद्याचे दर ३० रुपये किलोवर गेल्याचे कारण देऊन अचानक निर्यातबंदी लादली. याचा किसानपुत्र म्हणून आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. सुरुवातील फुकट देऊन नंतर व्यसन लावून २०० रुपये महिन्याचे घेणाऱ्या अंबानीला तुम्ही टीआरएआय ची बंधने लागू का करत नाहीत? कृषी निविष्ठांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत, यावर काहीच निर्बंध घातले नाहीत. शेतकऱ्यांना कुठे हक्काचे घामाचे चार पैसे मिळू लागले नाही तो निर्यातबंदी लादली. उत्पादन दुप्पट करा म्हणयचे व भाव पाडायचे, यातून काय साध्य करत आहात? वैश्विक संकटात तुमची लंगोट बनून लाज फक्त कृषी क्षेत्राने राखली आहे, त्याची परतफेड अशी भाव पाडून करता का? शेतकरीविरोधी मानसिकेची प्रचंड चिड येत असून आत्मनिर्भर भारतात शेतकरी येत नाहीत का‌‌ ? याचे भान ठेवून त्वरित निर्यातबंदी मागे घ्यावी, अन्यथा उत्पादकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल.

प्रा. संदीप वाघ, किसानपुत्र.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser