आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:79 शाळांतील 5820 विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र, कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांचा पुढाकार

हिंगोली9 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील ७९ शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावीच्या तब्बल ५८२० विद्यार्थ्यांना शुक्रवारी ता. २६ सकाळी आकरा वाजता एकाचवेळी जात प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार असून त्यांची आर्थिक पिळवणुक रोखण्यास मदत झाली आहे.

कळमनुरी तालुक्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी जात प्रमाणपत्राची आवश्‍यकता असते. मात्र मे व जून महिन्यामध्ये निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्रांसाठी एकच गर्दी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणुक होण्याचा संभाव्या धोका अधिक असतो या शिवाय सद्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर पाळणे आवश्‍यक अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी घेतला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्यातील ७९ शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील १३६४१ विद्यार्थी असल्याचा अहवाल दिला होता. त्यापैकी ७१३९ विद्यार्थ्यांची शाळास्तरावरच तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तयार करून घेण्यात आली होती. तर शाळेकडून प्रवेश निर्गम उतारा घेण्यात आला होता. त्यानुसार प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या ५८२० विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे तयार झाली आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तत्कालीन तहसीलदार दत्तू शेवाळे, विद्यमान तहसीलदार मयुर खेंगले यांनी मागील आठ दिवसांत हि सर्व प्रमाणपत्रे तयार केली आहेत.

त्यानंतर आता शुक्रवारी ता. २६ सकाळी आकरा वाजता एकाच वेळी ७९ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे वाटप केले जाणार आहेत. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रातील त्रुटी दुर करून त्यांनाही लवकरच जात प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी खेडेकर यांच्या या निर्णयामुळे ५८२० विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ थांबली असून शाळेतच प्रमाणपत्र मिळत असल्याने कोरोनाच्या परिस्थितीत सामाजिक अंतर पाळणेही शक्य झाले शिवाय विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणुक रोखण्यातही यश आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निर्णय- प्रशांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी कळमनुरी

कळमनुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीच हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील पंधरा ते वीस दिवसांत सर्व प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. शुक्रवारी ता. २६ शाळांमधून प्रमाणपत्रे वाटप केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. पुढील काळात इतर प्रमाणपत्र शाळास्तरावर देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...