आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:9 मुस्लिम राष्ट्रांच्या 59 विद्यार्थ्यांना फेलोशिपवर विद्यापीठात प्रवेश; केंद्रातील आयसीसीआरअंतर्गत 17 देशांतील 74 विद्यार्थ्यांचा फेलोशिपवर प्रवेश निश्चित

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक २६ विद्यार्थी अफगाणिस्तानचे

चालू शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १७ राष्ट्रांतील ७४ युवकांनी प्रवेश घेतला आहे. त्यामध्ये नऊ मुस्लिम राष्ट्रांतील ५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या ५९ विद्यार्थ्यांसह ७४ जणांच्या फेलाेशिपवर केंद्रातील माेदी सरकार दरवर्षी ३४ लाख ९६ हजार रुपये खर्च करणार आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तानातील लाेकांना नागरिकत्व नाकारण्यासाठी माेदी सरकारने ‘सीएए- एनआरसी’द्वारे कठोर पावले उचलल्याची टीका हाेत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षणासाठी भारतात आलेल्या बांगलादेश, अफगाणिस्तानासह १७ राष्ट्रांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर केंद्रातील मोदी सरकार फेलाेशिपच्या रूपाने खर्च करत आहे.

विद्यापीठांमध्ये दरवर्षी दोन प्रकारे विदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात. एक तर ज्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी केंद्र सरकार स्वीकारते त्यांचा प्रवेश निश्चित होतो. केंद्र सरकारच्या इंटरनॅशनल काैन्सिल फॉर कल्चरल रिलेशन अर्थात आयसीसीआर अंतर्गत विदेशी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. दुसरे म्हणजे स्वखर्चाने शिकणाऱ्यांचे प्रवेश होतात. केंद्र सरकारच्या फेलोशिपअंतर्गत २० देशांतील १२३ जणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १७ देशांतील ७४ जणांना १५ जुलै २०२१ रोजी प्रवेश देण्यात आले आहेत.

या ७४ विदेशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० ते ४० हजार रुपये दरमहा फेलोशिप दिली जाईल. त्याची एकूण रक्कम दरमहा ३४ लाख ९६ हजारपेक्षा अधिक होणार आहे. सर्वसाधारणपणे कोर्स पूर्ण होईपर्यंत अर्थात तीन वर्षे विद्यार्थी राहिले तर १ कोटी ४ लाख ८८ हजार रुपये केंद्राचे खर्च होणार आहेत. त्यामध्ये ९ मुस्लिम राष्ट्रातील ५९ युवकांचाही समावेश आहे. या ५९ विद्यार्थ्यांवर २७ लाख १४ हजार रुपये दरमहा खर्च होतील.

फेलोशिपचे विदेशी विद्यार्थी
२०२१-२२ ७६
२०२०-२१ १०७
२०१९-२० ६७
२०१८-१९ ५२

सर्वाधिक २६ विद्यार्थी अफगाणिस्तानचे
विद्यापीठातील प्रमुख मुस्लिम राष्ट्रांच्या ५९ विद्यार्थ्यांमध्ये एकट्या अफगाणिस्तानातील २६ जणांचा समावेश आहे. त्याखालोखाल येमेनची २१ आहेत. बांगलादेश-२, डिजिबाऊटी-१, इराक-२, केनिया-२, पॅलेस्टाइन-३, सुदान-१, सिरिया-१ यांचाही समावेश आहे. त्याशिवाय नेपाळ-७, झिम्बाव्बे-१, टांझानिया-२, मोझांबिक-१, मल्लावी-१, घाना आणि इथिअोपियाच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचे प्रवेश फेलोशिपअंतर्गत नक्की केले आहेत. आतापर्यंत १७२ विदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये स्वखर्चाने प्रवेश घेतलेल्या ९८ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. फेलोशिपचे ७४ विदेशी विद्यार्थी आहेत. स्वखर्चाने प्रवेशासाठी २२७ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९८ जण निकषात बसले आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य
विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंट सायन्स, सोशल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि गणित या विषयात प्रवेश घेण्याला प्राधान्य असल्याचे दिसते. त्याशिवाय भाषाशास्त्रात इंग्रजीसाठी, तर विज्ञानमध्येही विद्यार्थी प्राधान्य देतात, असे विदेशी विद्यार्थी विभागाचे संचालक प्रोफेसर विकासकुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...