आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडकोवासीयांसाठी रविवारचा दिवस आक्रोश अन् हुंदक्यांचा ठरला. शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला. यात बहिणींसह त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना जागीच मृत्युमुखी पडल्या. सायंकाळी सात वाजता परिसरात चार रुग्णवाहिकेतून सहा मृतदेह आले. शनिवारपर्यंत सोबत असलेल्या कुटुंबातील गंभीर जखमी सदस्यांना मृत्युमुखी पडलेल्या नातलगांचे चेहरेही पाहता आले नाहीत. केवळ पायाच्या अंगठ्याचे दर्शन घेऊन एकाच स्मशानभूमीत सहा जणांच्या चितेला अग्निडाग देण्याची वेळ कुटुंबावर आली.
काही महिन्यांपूर्वी मुलाने मारुती इर्टिगा कार खरेदी केली हाेती. याच गाडीतून बहिणींच्या कुटुंबाची देवदर्शनाला जाण्याची इच्छा होती. रविवारी (१२ मार्च) सर्वांना सुटी होती. त्यामुळे सकाळी सात वाजता दोन बहिणी, त्यांची दोन मुले, दोन सुना व नातवंडे असे एकूण तेरा जण समृद्धी महामार्गावरून शेगावच्या दिशेने निघाले. शेगाव अवघे सहा किलोमीटरवर असताना आठ वाजता मेहकरजवळ सिवनीपिसा येथे कारचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्याला धडकून कार रस्त्याच्या पलीकडे दोनशे ते तीनशे फूट उलटून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोसळली.
स्टिअरिंग लॉक झाल्याचा प्राथमिक संशय, त्यातून कार पलटून छप्पर फुटले जखमी सुरेश कार चालवत होते. सिवनीपिसा गावाजवळील पूल ओलांडताच पुलापुढे डांबराच्या भागावर त्यांचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्याच्या कठड्याला धडकली. गाडीचा वेग अधिक असल्याने सुरेश यांनी स्टिअरिंग वळवले व त्यातच ते लॉक होऊन दोन लेनधील दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर जाऊन कोसळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचे छत तुटले. अातील सर्वजण बाहेर फेकले गेले. कारचा चुराडा झाला. सीटबेल्टमुळे सुरेश कारमध्येच अडकले. मात्र ते काहीसे शुद्धीत होते. त्यांना बाहेर निघता येत नव्हते.
समोर कुटुंबातील सदस्य रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहून ते घाबरले. त्यांनी जिवाच्या आकांताने आक्रोश केला. मदतीसाठी याचना सुरू केली. अपघाताच्या आवाजाने शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी तत्काळ पत्रा वाकवून सुरेश यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दहा किलोमीटरवर मेहकर टोल प्लाझा असूनदेखील तब्बल ४० मिनिटे रुग्णवाहिका, पोलिस आले नाहीत हे विशेष. सर्वांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा किरण शुध्दीवर होते. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत आई, पत्नी व पुतणीला पाहून त्यांची प्रकृती बिघडली. काही वेळाने रुग्णालयात त्यांचाही मृत्यू झाला.
हे गंभीर जखमी : जखमींमध्ये मृत हौसाबाई यांचा लहान मुलगा सुरेश भरत बर्वे (३५), मोठी सून नम्रता रवींद्र बर्वे (३२), नातू रुद्र रवींद्र बर्वे (१२), यश रवींद्र बरवे (१०), सौम्या रवींद्र बर्वे (४), जतीन सुरेश बर्वे (४) व मुलीची मुलगी वैष्णवी सुनील गायकवाड (१९) हे गंभीर जखमी झाले. मेहकर शासकीय रुग्णालयात या सर्वांवर प्राथमिक उपचार करून दुपारपर्यंत उस्मानपुऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले.
सुखी कुटुंब, सर्वच कामात सहभागी हौसाबाई यांना सुरेश लहान, तर रवींद्र मोठा मुलगा होता. रवींद्र यांचा घराखाली लाँड्री व्यवसाय आहे, तर दहा वर्षांपूर्वीच निधन झालेल्या वडिलांच्या जागी सुरेश महावितरणमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरीला लागला. रविवारी पाणी येणार असल्याने रवींद्र एकटाच घरी थांबला होता. मनमिळाऊ स्वभावाचे सुरेश यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार आहे. त्यांची सख्खी मावशी प्रमिला जवळच नवजीवन कॉलनीत राहत होती. दोन्ही बहिणींसह सर्व भावंडं कायम एकत्र राहायचे. फिरण्यासाठीदेखील सोबत जायचे. हौसाबाई यांची एक मुलगी विवाहित असून जखमी वैष्णवी त्यांच्याकडेच राहते.
लग्नाला वर्षपूर्ती आणि मृत्यू साेबतच प्रमिला यांचा लहान मुलगा तुषार नाैदलात नोकरीला लागला. मोठा मुलगा किरणने कौटुंबिक व्यवसायवृध्दीवर भर देण्याचे ठरवले. राजीव गांधी मार्केटमध्ये लाँड्रीचा मोठा व्यवसाय असून त्यांचे वडील धोबी समाजाचे राज्यस्तरीय पदाधिकारी आहेत. किरण यांनी व्यवसाय वाढवून सर्व कर्ज फेडून ७ लाखांची नवीन मशीन विकत घेतली. शनिवारीच त्याचे उद्घाटन केले. दुर्दैव म्हणजे मृत्युमुखी पडलेले किरण व त्यांची पत्नी भाग्यश्री यांचा एक वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नाची वर्षपूर्ती साजरी केल्यानंतर दोघांना मृत्यूदेखील साेबतच झाला. त्यांची पत्नी निल्लोड गावची रहिवासी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.