आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:राज्यातील ६ लाख ऊसतोड कामगारांना लवकरच मिळणार विमा कवच, राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची माहिती

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

राज्यात कोवीडच्या पार्श्वभुमीवर ६ लाख ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याचे प्रयत्न असून त्या संदर्भात बुधवारी (ता. १६) मुंबई येथे बैठक झाली आहे. पुढील काही दिवसांतच ऊसतोड विमा देण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे.

या संदर्भात राज्य साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी सांगितले की, राज्यात १०० सहकारी तर ८७ खाजगी कारखाने आहेत. या कारखान्यांमधून सुमारे ६ लाख ऊसतोड कामगार काम करतात. सधारणतः नोव्हेंबर ते एप्रील महिन्यापर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम चालतो. सध्या कोरोना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा साखर कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून सरकार व सहकारी कारखाने दोघे मिळून कामगारांचा विमा भरण्याचे नियोजन आहे. एका कामगाराचा साधारणतः ७०० ते १००० रुपये विमा रक्कम येणार आहे. त्यातून कामगारांवर कोरोनामुळे दुर्देवी प्रकार ओढवल्यास त्यांच्या कुटुंबियांना १० ते १५ लाख रुपये मिळाले पाहिजे असे प्रयत्न आहेत. त्यानुसारच विमा रक्कम ठरवली जाणार आहे. काही विमा कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ६ महिने, ९महिने व १ वर्षाच्या कालावधीचा विमा असणार आहे. या शिवाय कोवीड झालेल्या कामगारांवर मोफत उपचार करण्याबाबतचे नियोजन असल्याचेही दांडेगावकर यांनी सांगितले.

सहकारी कारखान्यांचाही प्रतिसाद

या संदर्भात सहकारी साखर कारखान्यांना पत्र पाठवून कामगारांचा विमा काढण्याचे नियोजन असल्याचे कळविले होते. त्यामध्ये १०० पैकी एकाच दिवशी ७० कारखान्यांनी या संदर्भात पत्र देऊन यासाठी होकार दर्शविला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले.