आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवोद्गार:8 पैकी 6 लाखांवर खटले निकाली; खंडपीठ स्थापण्याचा उद्देश सफल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षकार व युवा विधिज्ञांनाही उपयुक्त ठरतील असे कायदेविषयक साक्षरता व जनजागृतीसाठी खंडपीठातून बाैद्धिक उपक्रम राबवावेत. संवादासाठी एक सेतूही बांधला जावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले. वंचितांना न्याय देताना तांत्रिकतेची अडचण साेडवता आली पाहिजे. परंतु तांत्रिकताच नकाे, असा अट्टहासही नकाे, असे सांगून न्या. वराळे यांनी न्यायदान प्रक्रियेतील शिस्त राखून काम करावे, असे आवाहन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी खंडपीठाच्या स्थापनेनंतर आठ लाख प्रकरणे दाखल झाली असून त्यातील सहा लाखांवर निकाली काढल्याने खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाल्याचे गौरवोद्गार काढले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते शनिवारी येथे बाेलत हाेते. मंचावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. संजय गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नितीन चाैधरी, सचिव सुहास उरगुंडे, उपाध्यक्ष संदीप आंधळे, निमा सूर्यवंशींची उपस्थिती हाेती. चर्चासत्रांचे आयाेजन, त्यासाठी विधिज्ञांच्या एका चमूने नवनवीन विषयांची निवड करून त्याचा एक प्रबंधही सादर करण्यासारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. न्यायालयीन व्यवस्थेतील उच्च परंपरांना कायम ठेवून नवीन, बंद पडलेल्या परंपराही सुरू केल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही न्या. वराळे यांनी व्यक्त केली. न्या. रवींद्र घुगे यांनी आतापर्यंत १७ न्यायमूर्ती खंडपीठाने दिले असल्याचे सांगून नवविधिज्ञांमधूनही अनेक जण न्यायदान प्रक्रियेत भविष्यात दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठात पक्षकारांना बसण्यासाठी जागा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला हाेता. खंडपीठ ज्यांना न्याय देण्यासाठी उभारण्यात आले ताेच पक्षकार दुर्लक्षित हाेताे की काय, अशी भीती व्यक्त केली हाेती. अॅड. एन. के. काकडे यांनी अनेक ज्येष्ठ वकील, न्यायाधीशांच्या आठवणी जागवल्या. आभार अॅड. सुहास उरगुंडे यांनी मानले.

फाैजदारी प्रकरणातील १ लाख ९१ हजार ५७१ खटले निकाली
औरंगाबाद खंडपीठात ८ लाख १९ हजार ५१९ खटले आजपर्यंत दाखल झालेले आहेत. पैकी ६ लाख ५३ हजार ९७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. फाैजदारी प्रकरणातील २ लाख १३ हजार ६५० पैकी १ लाख ९१ हजार ५७१ खटले निकाली काढले आहेत. दाेन लाख खटले प्रलंबित आहेत, असे न्या. संजय गंगापूरवाला यांनी या वेळी बाेलताना सांगितले. अभ्यासक विधिज्ञांनी कायद्याचा सखाेल अभ्यास करून स्वतःला तयार केले. त्यांनी केलेल्या पायाभरणीतून पुढची पिढी तयार झाली व यापुढची पिढीही अशीच अभ्यासपूर्ण हाेईल, असे आशादायक चित्र समाेर दिसते आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...