आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळख निर्माण झालेल्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान आज पार पाडले. येथील १७ जागेसाठी ६ वार्डातील ७२ उमेदवारांनी आपले भविष्य आजमावले असून किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
पावसाचा परिणाम
गुरुवार सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद अल्प होता. दरम्यान ११.३० वाजेच्या सुमारास पाऊस आल्याने मतदार घराबाहेर पडले नाहीत. मात्र, त्यानंतर दुपारी दीड वाजेपासून मतदारांनी मोठ्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेनंतर मोठी गर्दी झाल्याने मतदारांनी रांगा लावून मतदान केले. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्के मतांमध्ये वाढ होऊन ४६ बूथवरून ६०.४ टक्के मतदान झाले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, तर भाजपचे माजी महापौर बापू घडामोडे, राजू शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, वसंत प्रधान तसेच शिंदे गटाकडून सिद्धांत शिरसाट,राजेंद्र जंजाळ व इतर पदाधिकारी शहरातून खास उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी सर्वच बूथला भेटीदेऊन कानोसा घेतला.
मशीन बंद, मतदार ताटकळत उभे
वार्ड क्रमांक तीनसाठी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावरील बुध क्रमांक ३ ब येथील मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना तब्बल एक तास ताटकळत उभे राहावे. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अखेर अधिकारी-कर्मचारी यांनी धावाधाव करत बंद मशीन बदलून त्या जागी दुसरी दुरुस्त मशीन बसवली.
आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका उपाशी
मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण उशिरा मिळाले. मात्र, आशा कार्यकर्त्यांना दुपारचे जेवण न मिळाल्याने केळी खाऊन काम करावे लागले.
चर्चेला उधाण
मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना त्यांचे मतदान पूर्वीच झालेले आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे मूळ मतदारांच्या जागी कोणी मतदान केले? असा जिल्हापरिषद सदस्य सुरेश सोनावणे यांनी संशय व्यक्त करत याबाबत आपण कायदेशीर जाब विचारणार असल्याचे सांगितले.
कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वार्डात
बहुतांश कुटुंबातील सदस्यांचा पत्ता एकसारखा असूनही त्यांची नावे मात्र, वेगवेगळ्या वार्डात आल्याने अनेक मतदारांची तारांबळ उडाली. त्यासोबत काही उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे मतदान स्वतःला करता आले नाही. कारण त्यांचे मतदान इतर वार्डात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.