आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधनाचा अपव्यय:62% सिग्नलचे टायमिंग बंद ; सिग्नल सुटेपर्यंत एक ते दाेन मिनिटे वाहने सुरूच

औरंगाबाद / संतोष देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांवरील चौकात ५३ सिग्नल बसवले आहेत. मात्र, त्यापैकी १० सिग्नल पूर्ण बंद आहेत. ४३ सिग्नल सुरू आहेत. दुसरीकडे ३३ सिग्नलचे टायमिंग सुरू नाही. म्हणजेच शहरातील ६२ टक्के सिग्नल टायमरविना सुरू आहेत. नेमकी वेळ कळत नसल्याने सिग्नल सुटेपर्यंत एक ते दाेन मिनिटे वाहने सुरूच ठेवावी लागतात. यामुळे इंधनाचा माेठा अपव्यय हाेताे. स्मार्ट सिटी प्रकल्प, पोलिस, मनपा, परिवहन प्राधिकरण समितीच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती आेढवली आहे.

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था व पेट्रोलियम रिसर्च असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार एक सिग्नल ६० सेकंदांचे असेल तर चालकांनी ४५ सेकंद वाहन बंद ठेवल्यास पेट्रोल, डिझेलची माेठी बचत करता येते. त्यासाठी सिग्नलचे टायमिंग व्यवस्थित हवे. रस्ता व त्यावरील वाहतुकीनुसार त्याचे नियमन व्हायला हवे, अशा सूचना परिवहन, पोलिस विभागाला केलेल्या आहेत. मात्र, औरंगाबाद शहर याला अपवाद ठरत आहे. ६२ टक्के सिग्नलचे टायमर बंद असतात.

पोलिस आयुक्तालय, हायकोर्टासमोर : मध्यवर्ती बसस्थानक आणि पोलिस आयुक्तालय कार्यालयादरम्यान एक सिग्नल बंद आहे. उर्वरित सिग्नलचे टायमिंग बंद आहे. अशीच स्थिती हायकोर्टाशेजारील सिग्नलची आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता तिन्ही सिग्नलचे लाल लाइट सुरू हाेते. त्यामुळे वाहतूक एका मिनिटासाठी थांबली होती.

बीड बायपास, निराला बाजार, जि. प. समोरील सिग्नल बंद : बीड बायपासवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील सिग्नल बंद आहेत. निराला बाजार, जि. प. समोरील चौकातील सिग्नल बंद होते. भवानी पेट्रोल पंप, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील चौकातही हीच स्थिती असल्याचे दिव्य मराठी प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. नवीन सिग्नल बसवले, त्याचे टायमिंग बंद : दीडशे मीटर अंतरावरून सिग्नलची माहिती व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईच्या धर्तीवर जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, व्हीआयपी रोडवरील ३१ ठिकाणी एलईडी स्मार्ट सिग्नल बसवले आहेत. पण त्याचे टायमिंग सुरू नाही.

सेव्हन हिल्स परिसरात टायमिंगमध्ये घोळ एक सिग्नल ११० सेकंद तर दुसरे सिग्नल १९८ सेकंद व लगेच १०० असे चुकीचे टायमिंग दाखवते. उर्वरित सिग्नलचे टायमिंग बंद आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाहनधारक बुचकळ्यात पडतात व सिग्नल तोडून निघून जातात.

आकाशवाणी, दूध डेअरी चौकात संभ्रम आकाशवाणी व दूध डेअरी चौक बंद केल्याने सिडको ते बाबा अशी दुतर्फा वाहतूक सुरू आहे. असे असताना अचानक सिग्नल लागताे. बाहेरगावचे काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन नको म्हणून थांबतात तर काही निघून जातात. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.

सिग्नल तपासूनच आम्ही ताब्यात घेणार स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिग्नलवर २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आम्ही हस्तांतरणाच्या वेळी सिग्नल सुरू आहेत की बंद, टायमर चालू आहे का, हे तपासूनच ताब्यात घेऊ. - ए. बी. देशमुख, विद्युत विभाग प्रमुख, मनपा.

दोन नव्हे, १ काेटी ८ लाखांचा खर्च दाेन नव्हे तर १ काेटी ८ लाख रुपये खर्चून नवीन ३१ एलईडी सिग्नल बसवले आहेत. लवकरच त्याचे टायमर सुरू केले जाईल. यामुळे वाहनचालकांची अडचण दूर होईल. - ऋषिकेश इंगळे, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, स्मार्ट सिटी.

बातम्या आणखी आहेत...