आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या ३११३ दिवसांच्या कार्यकाळात देशांतर्गत ६३६ दिवस तर परदेशात सुमारे २५६ असा एकूण ८९२ दिवस प्रवास केला. पंतप्रधानपदावर असल्याने त्यांचे वास्तव्य नवी दिल्लीत आहे. मतदारसंघ वाराणसी असल्याने उत्तर प्रदेश आणि मायभूमी गुजरातमध्ये त्यांचे नियमित जाणे-येणे असतेच. या दोन राज्यांनंतर मोदी यांनी सर्वाधिक ४० भेटी महाराष्ट्राला दिल्या. यापैकी ११ दौरे अनौपचारिक होते. रविवारी ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात होते.
पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर (पीएमओ) पंतप्रधानांच्या आजवरच्या कामकाजाची सविस्तर माहिती आहे. यात पंतप्रधानांनी केलेल्या देशांतर्गत व परदेशी दौऱ्यांचा तपशील असून यात स्थळ, तारीख तसेच दौरा औपचारिक आहे की अनौपचारिक, हे नमूद आहे. या माहितीच्या विश्लेषणातून मोदी यांना २६ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशात त्यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भेटी दिल्याचे स्पष्ट झाले.
देशांतर्गत ६३६ दिवस प्रवास
मोदी यांनी पहिल्यांदा २६ मे २०१४ ला, तर ३० मे २०१९ रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा १४ जून २०१४ रोजी गोव्याचा केला. येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुमारे ३११३ दिवसांत त्यांनी देशांतर्गत ६३६ दिवस प्रवास केला. पैकी २३४ दौरे अनौपचारिक होते. काही दौऱ्यांत एका दिवसात एकाच शहराला, तर काही दौऱ्यात एका दिवसात ३-४ राज्यांतील शहरांना भेटी दिल्या.
महाराष्ट्रावर विशेष प्रेम
गेल्या ८ वर्षांत मोदी सर्वाधिक १३१ वेळेस यूपीतील विविध शहरांत, तर ९२ वेळी गुजरातेत गेले. पंतप्रधान झाल्यावर ते महाराष्ट्रात पहिल्यांदा २१ जुलै २०१४ रोजी मुंबईत आले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे ४० दौरे केले, पैकी ११ अशासकीय स्वरूपाचे होते. निवडणूक प्रचार, पक्षाचे कार्यक्रम वा लग्न समारंभांना हजेरीसारख्या कार्यक्रमांना अनौपचारिक दौऱ्याच्या श्रेणीत टाकेल जाते. २०१४ व २०१९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी ते सर्वाधिक वेळी राज्यात आले.
या राज्यांना पंतप्रधान मोदींनी अशा दिल्या भेटी
उत्तर प्रदेश 131
गुजरात 92
महाराष्ट्र 40
कर्नाटक 33
बिहार 30
प.बंगाल 25
झारखंड 23
उत्तराखंड 25
मध्य प्रदेश 24
जम्मू-काश्मीर 21
राजस्थान 20
तामिळनाडू 20
आसाम 19
केरळ 15
हिमाचल 19
ओडिशा 13
पंजाब 13
तेलंगण 10
गोवा 09
छत्तीसगड 08
आंध्र प्रदेश 09
त्रिपुरा 06
चंदीगड 04
मणिपूर 03
मेघालय 03
अरुणाचल 03
अंदमान नि. 02
दादर न. ह. 02
पाँडिचेरी 01
नागालँड 02
सिक्कीम 02
मिझोराम 01
लडाख/ लक्षद्धीप 01/01
नोव्हेंबर २०२२ पर्यंत २५६ दिवसांत ६५ परदेशी दौरे करत ६९ देशांना भेटी
पंतप्रधानपद स्वीकारताच नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्यांनाही सुरुवात केली. त्यांनी १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत २५६ दिवसांमध्ये ६५ परदेशी दौरे करत ६९ देशांना भेटी दिल्या. पंतप्रधान माेदी यांचे बहुतांंश परदेश दौरे एका दिवसापेक्षा अधिक कालावधीचे आहेत. त्यांनी सर्वाधिक भेट दिलेल्या देशांमध्ये अमेरिका २४ वेळा, जपान १८, जर्मनी व चीन प्रत्येकी ११, फ्रान्स ९, रशिया ८, ब्राझील ८, सिंगापूर ७, नेपाळ ७, यूएई ६, अर्जेंटिना ६, म्यानमार ५, उझबेकिस्तान ५, श्रीलंका ४, यूके ४ आणि इंडोनेशियाला ३ वेळा भेटी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.