आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसास्थळ असलेले बीबी का मकबऱ्याला देश-विदेशातील तीन ते चार हजार पर्यटक रोज भेट देतात. या पर्यटकांकडून दरवर्षी भारतीय पुरातत्त्व विभागाला कोट्यवधी रुपये मिळतात. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पाण्याची सोय करण्यासाठी पैसे खर्च करण्याची दानत पुरातत्त्व विभागात नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी मकबरा पाहण्यासाठी ९ लाख ८१ हजार ६०६ पर्यटक आले. त्यांनी खरेदी केलेल्या तिकिटांतून तब्बल २ कोटी ५६ लाख ५५ हजार २७५ रुपये पुरातत्त्व विभागाला मिळाले. असे असले तरी मकबरा परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्याचबरोबर तेथील झाडांनाही पुरेसे पाणी दिले जात नाही. त्यामुळे ४१ अंश सेल्सियसवर पोहोचलेल्या तापमानात पर्यटक तहानेने व्याकूळ होत आहेत, तर मकबरा परिसरातील उद्यानातील झाडे माना टाकत आहेत. एवढेच नव्हे तर येथील स्वच्छतागृहातही पाणी नसल्यामुळे पर्यटकांनी कुचंबणा होत आहे.
पाण्याचा ठणठणाट : भारतीय पुरातत्त्व विभागाकडे बीबी का मकबरा व परिसराचे व्यवस्थापन आहे. मकबऱ्याला रोज हजारो पर्यटक भेटी देतात. शुक्रवारी ३,३४३ भारतीय, तर ७ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. भारतीय पर्यटकांकडून प्रत्येकी २५ रुपये तर विदेशी पर्यटकांकडून ३०० रुपये तिकीट घेतले जाते. यातून ८५,८०० रुपये एवढे उत्पन्न भारतीय पुरातत्त्व विभागाला मिळाले. असे असतानादेखील विभागाने पर्यटकांसाठी पाण्याची सोय केलेली नाही. शुक्रवारी तापमान ४१ अंश सेल्सियस होते. पर्यटकांना मकबऱ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. पर्यटकांसाठी ‘आरओ फिल्टर’ यंत्रणा बसवली आहे. मात्र तेथे पाणीच उपलब्ध नसते. त्यामुळे पर्यटकांना मकबरा परिसरातील विक्रेत्यांकडून पाण्याच्या बाटल्या घ्याव्या लागतात. तेथे विक्रेतेही पर्यटकांची अडवणूक करतात. १५ ते २० रुपये किमतीची पाण्याची बाटली २५ रुपयांना विकली जाते. नाइलाज म्हणून पर्यटकांना हे पाणी विकत घ्यावे लागते. मकबरा परिसरात उभारलेल्या स्वच्छतागृहातदेखील पाणी नसते. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
माध्यमांशी बोलण्यास नकार : बीबी का मकबरा येथील पर्यटकांसाठी पाण्याच्या सोयीसंदर्भात माहिती घेण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक शिवकुमार भगत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. बीबी का मकबरा येथील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘आम्हाला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंधने घातली असून तुम्ही थेट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधीक्षकांनाच विचारा.’
उन्हाळ्यापूर्वीच नियोजन करावे
मकबऱ्याला देशभरातून पर्यटक भेटी देण्यासाठी येतात. दरवर्षी उन्हाळ्यात तेथे पाणी कमी पडते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने उन्हाळ्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करून ठेवायला हवे. झाडांनादेखील पाणी द्यावे. पर्यटकांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांवर गैरसोय होऊ नये, याची काळजी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घ्यायला हवी. - जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन.
उद्यानासाठी रोज ५ टँकर हवे
मकबरा परिसरातील बोअर आणि विहिरींचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मकबऱ्यातील कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. झाडे आणि गार्डन वाचवण्यासाठी सध्या रोज ५ टँकर पाण्याची गरज आहे. मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हे लाखो रुपयांची झाडे संकटात सापडली आहेत.
लाखो रुपयांची झाडे वाळू लागली
फेब्रुवारीत छत्रपती संभाजीनगर शहरात ‘जी २०’ परिषदेनिमित्त परदेशी पाहुणे आले होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने बीबी का मकबरा परिसरात २०० मोरपंखी झाडांची लागवड केली आहे. एक झाड ५०० रुपयांचे आहे. या झाडांच्या लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही झाडे आता पाण्याअभावी वाळत आहेत. मकबरा परिसरातील उद्यानांमधील छोटी झाडे पाण्याअभावी माना टाकत आहेत. ४१ अंश सेल्सियस तापमानात देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांची पाण्याअभावी घालमेल, उद्यानातील झाडांनी टाकल्या माना
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.