आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचा पाणीप्रश्न पाण्याच्या टंचाईचा नाही तर प्रशासनाच्या नियोजनातील अभावाचा आहे हे सिद्ध करणारा हा पुरावा. एकीकडे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना शहरातील अवैध नळ कनेक्शनवर महापालिका करीत असलेली कारवाई मात्र कासवगतीने सुरू आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर ६७ हजार कनेक्शन तोडण्यासाठी महापालिकेस तब्बल १८ वर्षे लागतील, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे या कासवगतीचा व प्रशासनातील अनिर्बंध कारभाराचा गैरफायदा घेत महापालिकेने तोडलेले अवैध नळ कनेक्शन पुन्हा जोडले जात असल्याचे दिव्य मराठीच्या पडताळणीत पुढे आले आहे. पालिका प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या व उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अवैध नळ तोडणीची मोहीम केवळ कागदी घोडे बनली आहे.
मनपा प्रशासनाने चिकलठाणा, हनुमान टेकडी, मकबरा रोड, शंभूनगर, त्रिशरण चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडीसह जुन्या शहरातही अवैध नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यात सुरुवातीला अनेक भागांमध्ये मुख्य लाइनवरूनच घेतलेले कनेक्शन तोडण्यात आले होते. सध्या काही निवासी व कमर्शियल अवैध कनेक्शन कट करण्याचे काम सुरू आहेत. मात्र, मनपा प्रशासनातर्फे कधी पोलिस बंदोबस्त मिळाला नसल्याचे तर कधी कर्मचाऱ्यांची कमतरता दाखवून ही कारवाई पुढे ढकलण्यात येते. केलेली कारवाई अत्यंत किरकोळ स्वरूपात होते. अनेक मोठे व्यावसायिक, हॉटेलधारकांनी घेतलेल्या अवैध नळ जोडण्या तोडण्यात पाणीपुरवठा विभाग अधिकच हात राखून काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकंदरीत कारवाईतील दिरंगाई व दुजाभाव या मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
१८० चे लक्ष्य फक्त कागदावर या तीन टीम्सना दररोज किमान १८० अवैध नळ तोडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. यानुसार दररोजचे काम झाले तरी शहरातील सर्व अवैध कनेक्शन तोडण्यासाठी दोन वर्षे लागतील. मात्र, आता हे लक्ष्यही पूर्ण करण्यात येत नाहीये. सध्या सरू असलेल्या गतीने हे काम सुरू राहिले तर तब्बल १८ वर्षे लागतील अशी परिस्थिती आहे. मनपाच्या या कासवगतीचा गैरफायदा घेत तोडण्यात आलेली नळ कनेक्शन्स त्यापेक्षा अधिक गतीने पुन्हा जोडण्यात येत आहेत.
अवैध नळ तोडणी केल्यानंतर पुन्हा जोडणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू सध्या मुख्य लाइनवरून कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आगामी काळात टीम वाढवून मोहिमेचा वेग वाढवू. तसेच जे कनेक्शन तोडल्यानंतर पुन्हा जोडणी करत आहेत, अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. संतोष टेंगळे, उपायुक्त मनपा
तीन टीम नेमल्या तरीही काम संथ मनपा प्रशासनातर्फे ही मोहीम राबवण्यासाठी तीन इंजिनिअर, दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी, एक मुख्य लेखाधिकारी अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन टीम्समध्ये प्रत्येकी तीन-चार कर्मचारी देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी एकापेक्षा अधिक अवैध कनेक्शन्स, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष शंभूनगर, त्रिशरण चौक, मकबरा रोड मुख्य लाइन, चिकलठाणा या ठिकाणी महापालिकेने तोडलेल्या अवैध नळ कनेक्शन्सची दिव्य मराठीने पुन्हा पाहणी केली असता, बहुतांश नागरिकांनी तोडलेले अवैध कनेक्शन पुन्हा जोडल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी असेच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
हद्द म्हणजे, काहींनी एकापेक्षाही जास्त कनेक्शन घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे पाण्याचे ढिसाळ वितरण सुधारण्यासाठी याचा काहीही उपयोग होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. महापालिकेची मोहीम कुचकामी ठरत असल्याचे हे पुरावे आहेत. प्रशासन मात्र गुन्हे दाखल करण्याच्या फक्त वल्गना करीत आहे. तोडलेली कनेक्शन्स पुन्हा जोडणाऱ्यांविरोधात आक्रमक मोहीम राबवण्याची गरज असताना महापालिका प्रशासन याबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.