आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पांचा ‘प्रसाद’:विसर्जनात 68 टन निर्माल्य गोळा; 6 कि. वॅट वीज, 6 टन खतनिर्मिती

औरंगाबाद / रोशनी शिंपी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्ता गणरायाने दरवर्षी प्रमाणे सर्वांच्या संकटांचे निवारण तर केलेच. पण जाताजाता पर्यावरण रक्षणासाठी ६ टन खत, ६ किलोवॅट वीजही देऊन गेला. शहरातील १२ विसर्जन केंद्रांवर मनपा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ६८ टन निर्माल्याचे संकलन झाले, यातून ही निर्मिती होणार आहे..

मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, यंदा १२ केंद्रांवर १० स्वयंसेवी संस्थांचे प्रत्येकी ५ स्वयंसेवक आणि ७० ते ८० मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आले. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हा उपक्रम सुरु होता. संकलित निर्माल्य एका ठिकाणाहून प्रकल्पांवर नेण्यासाठी १२ ट्रॅक्टर ट्रॉली, १० हूक लोडर बिन, १० हायवा, १३ अॅपेरिक्षा होत्या. यासाठी झोनप्रमाणे नियोजनही केले होते.

दिवसभरात एकूण ६८ टन निर्माल्य जमा झाले. यात ओले, प्लास्टिक व नारळाचे भाग होते. पैकी ४८ टन निर्माल्य कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्पावर दिले. ३५ दिवस त्यावर प्रक्रिया होईल अन् त्यातून ६ किलो वॅट वीजनिर्मिती होईल. तर २० टन निर्माल्य मातोश्री वृद्धाश्रमाला दिले आहे. याठिकाणी ४५ दिवसांच्या प्रक्रियेनंतर त्याचे खतात रूपांतर होईल.

अचूक नियोजन, युवकांचा सहभाग
मागील सात वर्षांपासून आम्ही निर्माल्य संकलन करतो. आमच्याप्रमाणेच विविध महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. पण, यंदा महापालिकेने अचूक नियोजन केल्याने या कामात सुसूत्रता आली. निर्माल्यातून नवनिर्मिती होईल, हीच गणरायाची भेट ठरेल.
सनवीर छाबडा, स्वयंसेवी संस्था अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...