आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग दोन वर्षे कोविडचा फटका, त्यानंतर साहित्याची दरवाढ आणि यंदाचा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे यंदा ऐन उन्हाळ्यात कूलरचा व्यवसाय ‘थंड’ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी मार्च महिन्यातच कूलरला मोठी मागणी असते. उन्हाळ्याच्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत दरवर्षी शहरातील ४४ लहान-मोठ्या कारखान्यांत तयार होणाऱ्या कूलरच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा ही विक्री अवघ्या ३० ते ३५ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कूलर तयार करणाऱ्या ७ उद्योजकांनी आपले कारखाने बंद करून टाकले आहेत. मात्र आता या आठवड्यात तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने कूलरच्या विक्रीत काही प्रमाणात मागणी आल्याने उद्योजक-व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगरातून तयार होणारे कूलर मराठवाड्यासह महाराष्ट्रात विक्रीसाठी जातात. त्यात प्रथम क्रमांकावर पुणे शहर व जिल्हा आहे. साधारण दोन हजारांपासून पाच हजार रुपये किमतीच्या स्टील बॉडीच्या कूलरला सर्वाधिक मागणी आहे. मोटार, वाळा (ताट्या), फॅन, पत्रा व स्टीलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५०० ते ८०० रुपयांची दरवाढ झाली आहे. नारेगाव येथे कूलरचे सर्वाधिक कारखाने आहेत. तेथे पूर्वी दिवसाकाठी १५० ते २०० कूलर तयार होत असत. आज हा आकडा केवळ २० ते ३० वर आला आहे. या कारखान्यांत हजारो कूलर पडून आहेत. प्रत्येक कारखान्यात साधारण १० ते १५ कारागीर काम करतात. मशीनवर कूलरची बॉडी तयार करण्यापासून ते सुट्या भागाची जुळवाजुळव करण्यापर्यंतची सर्व कामे एकाच छताखाली केली जातात. ८ महिने काम केल्यानंतर उन्हाळ्याच्या चार महिन्यांत कूलरच्या विक्रीकडे कारखान्यांचे मालक आणि कारागिरांचे डोळे लागलेले असतात.
मोठे आर्थिक नुकसान
निसर्गाच्या लहरीपणाचा थेट फटका आमच्या व्यवसायाला बसत आहे. पुढील १५ दिवसांसाठी कशाला कूलर खरेदी करायचे? अशी ग्राहकांची मानसिकता असते. त्यामुळे यंदाचा सीझन हातातून स्पष्टपणे गेल्याचे दिसत आहे. आता आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. - रफिक पटेल, उद्योजक
या वर्षी उन्हाळ्याच्या उर्वरित काळात तरी कूलरची चांगली विक्री होईल, अशी आशा कूलरचे कारखानदार व्यक्त करत आहेत.
यंदा ३० टक्केच व्यवसाय
दरवर्षाप्रमाणे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात कूलर पोहोचवण्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, पुणे वगळता इतर जिल्ह्यांतून अतिशय कमी प्रतिसाद मिळाल्याने यंदा केवळ ३० टक्केच व्यवसाय झाला आहे. संपूर्ण माल गोदामातच पडून आहे. - मिर्झा सिराज, उद्योजक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.