आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:'सुपोषित औरंगाबाद' करिता विशेष धडक मोहिमेत 728 बालके कुपोषित, 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पोषणासाठी विशेष अभियान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीव्र कुपोषित बालकांवर बालग्राम केंद्रात उपचार व पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये तीन महिने दाखल करून त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषित बालकांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात प्रत्यक्ष मुलांचे वजन करुन त्यांच्या पोषणाची स्थिती जाणून घेण्यात कोरोनामुळे बाधा निर्माण झाली होती. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी अति तीव्र कुपोषित-मध्यम कुपोषित (सॅम-मॅम) बालकांसाठी विशेष धडक शोध मोहिमेला १७ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली होती. यात आतापर्यंत झालेल्या पाहणीत ७२८ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. अशी माहिती जि.प. महिल व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्याअंतर्गत ४११ पथके बनविण्यात आले असून सदर पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती आणि ए.एन.एम, मदतनीस आदींच्या सहकार्यातून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आणखी दोन दिवस ही मोहीम चालणार आहे. कोरोनामुळे कुपोषित बालके शोधण्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. याचे कारण काही गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्णसंख्या आढळून आल्याने प्रत्यक्ष घरोघरी जावून वजन करण्यात अडचण येत असल्याने कुपोषणास्थिती जाणून घेण्यात अडथळे निर्माण झाले होते. परंतु आता परिस्थिती सुधारल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सर्वेक्षण आवश्यक
आपल्याकडे १७०९ अंगणवाडी केंद्रांचे सर्वेक्षण बाकी असून जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या तीव्र कुपोषित बालकांवर बालग्राम केंद्रात उपचार व पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये तीन महिने दाखल करून त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. यात अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन बालकांची पोषण स्थिती काय आहे याची माहिती घेण्यात असून कोरोनाची तिसरी लाट पाहता जास्तीत जास्त बालकांचे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. अशी माहिती जि.प. महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

बालमृत्यूला आळा घालणे -
आत्तापर्यंत जिल्ह्यातील १७६४ अंगणवाडी केंद्रात १ लाख १४ हजार ५९० बालांचे वजन आणि उंची घेण्यात आली आहे. यामध्ये ७२८ बालके ही अति तीव्र कुपोषित तर ३ हजार ९८२ मध्यम कुपोषित आढळली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता या शोध मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त दिसत असली तरी बालकांवर उपचार करण्यासाठी आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम चांगली आहे, यातून कुपोषणाची खरी आकडेवारी समोर येईल. त्यानुसार पुढील काम केले जाईल असेही मिरकले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...