आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:नोकरी, कर्जाचे आमिष दाखवून 74 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज व नोकरीचे आमिष दाखवून एकाने बारा जणांची ७४ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी शैलेश बाबुराव कांबळे (४९, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गादिया विहार) विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

पन्नालालनगर येथील अॅड. देवकांत मेश्राम (४५) यांची ऑगस्ट २०२० मध्ये मित्र अ‍ॅड. सुनील सरकटे यांच्यामार्फत शैलेशसोबत ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत शैलेशने ओळखपत्र दाखवून मेश्राम यांचा विश्वास संपादन केला. बँकेत असल्याचे सांगून मी कर्जही काढून देतो, नोकरी देतो असे आश्वासन दिले. पहिल्या भेटीत त्याने ४० लाखांचे शेळीपालन योजनेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी मेश्रामकडून त्याने ५० हजार रुपये रोख घेतले. पंधरा दिवसांनंतर कांबळेने पुन्हा त्यांना एसबीआय बाहेर बोलावून प्रोजेक्ट रिपोर्ट आला असून उर्वरित रकमेसाठी दोन लाख रुपये घेत ९० दिवसांत कर्ज मंजूर होण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्यानंतर त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. शैलेशने विश्वास संपादन केल्याने त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोणी असल्यास सांगा, असा निरोप दिला. मेश्राम यांनी सटवाजी भालेराव यांना सांगितले. भालेराव यांनी मुलगा व इतर नात्यातील मुलांसाठी प्रत्येकी दोन लाख २५ हजार व इतर रक्कम मिळून एकूण त्याला १८ लाख ५० हजार रुपये दिले. ९० दिवसांत नोकरीची ऑर्डर मिळेल, असे शैलेशने सांगितले. नंतर कोरोनाचे कारण देत शैलेशने सर्वांना ऑर्डर भेटण्यासाठी वेळ लागेल, असे सांगून आणखी एका सरकारी योजनेंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवले हाेते.

आत्महत्येची धमकी देत पैसे देण्यास नकार
भालेराव यांनी कर्जासाठी कांबळेशी संपर्क साधल्यानंतर त्याने केंद्र सरकारची अ‍ॅल्युमिनियम शीट्स बनवण्याची स्कीम असून २५ कोटींचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवले. २५ टक्के सबसिडी असून १२ कोटी रुपये भरण्यास सांगितले. भालेराव यांनी जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात चार लाख रुपये रोख कांबळेला दिले. बरेच दिवस होऊनही काहीच हाती लागत नसल्याने पैसे दिलेले सर्व नातेवाईक मेश्राम व भालेराव यांना सतत संपर्क करू लागले तेव्हा मात्र शैलेशने खरा रंग दाखवत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व आत्महत्येची धमकी दिली व पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...