आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:‘धागा’ म्हणून मागवला 8 लाखांचा नायलॉन मांजा ; गुन्हे शाखेचा ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्ष्यांसह माणसांसाठीदेखील अत्यंत घातक नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात आठ लाखांच्या मांजाची ऑर्डर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने गुरुवारी मोंढ्यातील गोडाऊनवर छापा टाकत हा मांजा जप्त केला. रंगार गल्लीतील हिना पतंग दुकानाच्या मुज्जुभाईने याची ऑर्डर दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मांजाची गांभीर्याने दखल घेतली. मांजामुळे पक्ष्यांसह नागरिकांचे प्राण गेल्याच्या घटनांचा उल्लेख करत पोलिस प्रशासनासह मनपाला न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी खडे बोल सुनावले. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी दुपारी गुन्हे शाखेचे पथक यासंदर्भात माहिती घेत असताना निरीक्षक अविनाश आघाव यांना एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मांजा आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांना कारवाईचे आदेश दिले. रेंगटीपुरा रस्त्यावर खासगी वाहने उभे करून कर्मचारी, अधिकारी पायी चालत थेट गोडाऊनमध्ये घुसले. एका कोपऱ्यात गोल्ड, किंगफिशर व हीरो प्लस कंपनीचे नायलॉन मांजाचे २२ बॉक्स आढळून आले. सर्व मुद्देमाल जप्त करत व्यवस्थापक मुश्ताकला ताब्यात घेत ठाण्यात नेले. सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांच्यासह उपनिरीक्षक रमाकांत पटारे, पोलिस नाईक संजय नंद, संदीप तायडे, अमोल शिंदे, राहुल खरात, सुनील बेलकर यांनी ही कारवाई केली.

ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालकही आरोपी नवाबपुऱ्यातील हिना पतंगच्या मुज्जुभाईने हा मांजा मागवला हाेता. पोलिसांनी त्यांच्यासह ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यवस्थापक मुश्ताक खान मुसा खान (४५, रा. नवाबपुरा), कंपनीचा मालक मनोहरलाल लोचवाणी (रा. सिंधी कॉलनी) यांच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

२५ ते ३० व्यापारी मागवतात मांजा मुज्जुभाईसह राजाबाजार, नवाबपुरा, सिटी चौक, जिन्सी परिसरात २५ ते ३० व्यापारी दिल्ली, उत्तर प्रदेश व मुंबईवरून नायलॉन मांजा मागवतात. कारवाई सुरू झाल्यानंतरही यांनी धाग्याच्या नावाखाली मांजाची ऑर्डर केली. मुज्जुभाई गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. यापूर्वी त्यांच्यावर कारवाया करण्यात आल्या आहेत. परंतु कठोर कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांना धाक बसत नाही.

दिल्लीवरून आणला एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मांजा, ज्यामध्ये २२ बॉक्स ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आले. विक्रीस बंदी असलेल्या ९६० चकऱ्या हाेत्या. एका चकरीची किंमत संक्रांतीच्या काळात जवळपास १ हजार ते ११०० रुपयांपर्यंत जाते. हा मांजा दिल्लीवरून आणला हाेता. या छाप्यापूर्वीदेखील मोठ्या ऑर्डर आल्याचे मांजा विक्रेत्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...