आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थकारणावर प्रश्नचिन्ह:उड्डाणपुलावर कार दुभाजकाला धडकून फुटल्या 8 कुंड्या

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘जी-२०’ परिषदेनिमित्त महापालिकेकडून शहरात सुरेख सुशोभीकरण करण्यात आले. प्रशासनाकडून सातत्याने ते जपण्याचे आवाहन केले जात असताना मात्र एका कारचालकाने सुसाट कार चालवत सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरील सजावटीचे नुकसान केले. त्यात ८ कुंड्या फुटल्या. मनपाने याप्रकरणी पोलिसांना पत्र देत त्याच्यावर कारवाईची मागणी केली. त्यात ८ कुंड्या फुटल्याने ८२ हजार ९८४ रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. एका कुंडीची किंमत चक्क १० हजार ३७३ रुपये असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरात सुशोभीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, उड्डाणपुलांची डागडुजी, रंगकाम, आकर्षक रोषणाई आदी कामे करण्यात आली. प्रामुख्याने रस्त्यांच्या दुभाजकांवर मनपाच्या उद्यान विभागाकडून विविध जातींची फुले, रोपटी व झाडे लावण्यात आली. सिमेंट व फायबरच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. बुधवारी सकाळी मारुती अल्टो (एमएच २० - ईवाय ०१९४) कारचालक वेगाने सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरून जात होता. चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट दुभाजकावर चढली. त्या वेळी दुभाजकांवर ठेवलेल्या सिमेंट व फायबरच्या प्रत्येकी आठ कुंड्या फुटल्या.

वसुलीचा अधिकार नाही : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, अशा घटनांमध्ये पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करता येते. मात्र, नुकसानीच्या वसुली करण्याचा कुठलाही अधिकार पोलिसांना नाही.

महापालिकेचे पोलिसांना पत्र या घटनेनंतर मनपाच्या मुख्य उद्यान अधिकाऱ्यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना पत्र पाठवले. त्यात घटनेचा उल्लेख करत चालकाने घटनेनंतर पळ काढला. सुशोभीकरणांतर्गत रीतसर निविदा मागवून या कुंड्या कंत्राटदाराकडून घेतल्या आहेत. त्यानुसार शोभिवंत झाडांसह सिमेंट व फायबरच्या प्रत्येकी आठ अशा १६ कुंड्यांची खरेदी किंमत ८२ हजार ९८४ इतकी आहे. वाहनचालकाविरुद्ध कारवाई करून मनपाच्या आर्थिक नुकसानीपोटी ८२ हजार ९८४ रुपयांची वसुली चालकाकडून करावी व ही रक्कम महापालिकेला वर्ग करावी, अशी विनंती या पत्रात केली आहे.

दंडाच्या रकमेचा समावेश जी-२० परिषदेसाठी खास दुसऱ्या शहरातून झाडे मागविली. त्यासाठी विशेष कुंड्या तयार करण्यात आल्या. माती विकत आणली. संबंधित चालक निष्काळजीपणे गाडी चालवत होता. कर्मचाऱ्यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांना अरेरावीची भाषा वापरली. पोलिसांना दिलेल्या पत्रात मजुरी, खरेदीसह आर्थिक नुकसान सांगण्यात आले असून त्यात दंडाच्या रकमेचादेखील समावेश आहे. - विजय पाटील, उद्यान निरीक्षक, मनपा.

बातम्या आणखी आहेत...