आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टाळेबंदी:लॉकडाऊनमध्ये 83 टक्के शेतकरी महिलांवर उपासमारीची वेळ, ‘मकाम’ ने 17 जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: महेश भंडारकवठेकर
  • कॉपी लिंक
  • टाळेबंदीत 10 टक्के महिलांना एक वेळचे, तर 7 टक्के महिलांना दोन वेळचे जेवण मिळाले नाही

लॉकडाऊनमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांतील ८३ टक्के महिला शेतकरी व शेेतमजूर महिलांची उपासमार झाली आहे. यापैकी १०% महिलांना एक वेळचे तर ७ टक्के महिलांना दोन वेळचे जेवण मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यातून आलेले लॉकडाऊन यामुळे महिला शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर झालेले परिणाम जाणून घेण्यासाठी महिला किसान अधिकार मंच- ‘मकाम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी उघड झाल्या आहेत. ‘मकाम’ने १७ ते २५ मे २०२० या काळात केलेल्या या सर्वेक्षणात १७ जिल्ह्यांतील ९४६ महिलांचा समावेश होता. ‘मकाम’ च्या सर्वेक्षणानुसार, प्रामुख्याने शेती करणाऱ्या, एकट्या, शेतमजूर तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा समावेश सर्वेक्षणात करण्यात आला होता. सर्वेक्षणातील ९५ टक्के महिलांचे नाव रेशनकार्डात आहे. महिलांनी रेशनवर केवळ गहू आणि तांदूळ मिळाल्याचे सांगितले. मात्र लॉकडाऊनमुळे इतर आवश्यक अन्नधान्य आणि भाजीपाला मिळवणे अवघड गेले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सात टक्के महिलांनी दोन वेळचे जेवण मिळाले नसल्याचे सांगितले. १० टक्के महिलांनी दिवसातून एकच वेळ जेवण केल्याचे सांगितले, तर ८३ टक्के महिलांनी उपासमार झाल्याचे सांगितले. ज्वारी, बाजरीसारखी धान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळे, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, मटण यांचा आहारातील समावेश लॉकडाऊनमध्ये घटला. काही भागात अंडी-मटण खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या गैरसमजातून हे खाणे टाळल्याचेही कारण आहे.

सविस्तर अहवाल makaam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लॉकडाऊन : कोरोना संसर्गाचा शेतीवरही परिणाम

सर्वेक्षणात सहभागी शेती करणाऱ्या ७११ पैकी २१९ (१९%) महिलांनी लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा पिकांची कापणी राहिली होती असे सांगितले. लॉकडाऊनमध्ये मजूर न मिळणे, मजुरी देण्यासाठी पैसे नसणे आदी कारणांमुळे कापणी न करता आल्याने या महिलांना मोठे नुकसान सोसावे लागले.

45% महिलांना काम मिळाले नाही

60% विधवा महिलांना पेन्शन नाही

55% महिलांकडे जनधन खाते नाही

67% उज्ज्वला लाभार्थी नाहीत

56% महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ नाही.

या जिल्ह्यांत सर्वेक्षण

-रायगड -पुणे -सोलापूर -उस्मानाबाद -बीड -लातूर -नांदेड -परभणी -हिंगोली -वाशिम -यवतमाळ -अकोला -अमरावती -वर्धा -नागपूर -गडचिरोली -नंदुरबार