आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची शोकांतिका:दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्यात 3 कॅबिनेट मंत्री असलेल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील 833 शाळांना वीजपुरवठ्यासाठी निधीच मिळेना

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे दोन नेते केंद्रात मंत्री आहेत, तर तीन नेते राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. कधी नव्हे एवढे चांगले दिवस या जिल्ह्याला आले आहेत. त्याचा फायदा करून घ्या,’ असे दावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे वास्तव शुक्रवारी एका बैठकीत समोर आले. ग्रामीण भागात सुरू असलेल्या ८३३ शाळांचे थकलेले वीज बिल भरण्यासाठी निधीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची व्यथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर मांडली. त्यावर सारेच शांत झाले.

जिल्ह्यातील अमृत सरोवर योजनेचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी गटणे यांनी जिल्ह्यातील २१३१ शाळांपैकी ८३३ शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याचे सांगितले. निधीअभावी संबंधित शाळांना तूर्तास वीजपुरवठा मिळू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर औरंगाबाद जिल्ह्यात सोलारद्वारे वीजपुरवठ्याची योजना राबवली जात आहे. ‘सीएसआर’ मधून ही योजना राबवून शाळांना वीज दिली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, जलजीवन योजनेत १३५० गावांचा समावेश करण्यात आला असून एक हजार गावांसाठीचा आराखडा तयार केला आहे. तीनशेवर गावात योजना सुरू झाल्याचे गटणे यांनी सांगितले.

तत्कालीन शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच
दोन वर्षांपासून वीज बिल न भरल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील ६८९ शाळांची वीज एप्रिल महिन्यात कापण्यात आली. तेव्हा अनेक गावांमध्ये चक्क लोकवर्गणी करून बिल भरण्याची वेळ आली होती. दिव्य मराठीने १३ एप्रिल रोजी हे वृत्त प्रकाशित केले तेव्हा राज्य सरकार खडबडून जागे झाले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेऊन निधीची तरतूद करण्याचे आदेश दिले होते, तर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही १४ कोटींचा भरणा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्या वेळी नुसत्याच घोषणा झाल्या. संपूर्ण पैसे मिळाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करणार नसल्याचे महावितरणने तेव्हाही स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...