आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवत 87 हजार रुपये पळवले; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पाळत ठेऊन केलेला प्रकार

वसमत शहरात साई गॅस एजन्सी जवळ पैसे भरण्यासाठी बँकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी 87 हजार रुपये पळविल्याची घटना गुरुवारी ता. 5 सकाळी साडेआकरा वाजता घडली आहे. या प्रकारामुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. वसमत शहरातील मालेगाव रोड भागात साई गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी गजानन दरंगे हे बुधवारी ता. 4 सायंकाळी उशीरा पर्यंत जमा झालेली 87 हजार रुपयांची रक्कम आज सकाळी साडेआकरा वाजता वसतमच्या बँक ऑफ इंडिया शाखेत जाण्यासाठी निघाले होते.

मात्र त्यांनी गॅस एजन्सीच्या खाली उतरल्यानंतर बाजूलाच रस्त्यावर दुचाकीवर दोघे जण तोंडाला रुमाल लाऊन त्यांची वाट पहात होते. यावेळी दरंगे हे एजन्सीमधून खाली उतरताच दुचाकीवर आलेले दोघे त्यांच्या समोर थांबले. त्यापैकी एकाने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून बॅग देण्याची मागणी केली. बंदूकीच्या धाकामुळे दरंगे काहीही करू शकले नाही. त्यानंतर चोरट्यांनी बॅग घेऊन पोबारा केला. यावेळी दरंगे यांनी आरडा-ओरड केली. मात्र त्या परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक प्रकाश आवडे यांच्यासह पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता दुचाकीवर आलेल्या दोघांनी बंदूकीचा धाक दाखवून रक्कम पळविल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही मधये कैद झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी नांदेड, परभणी येथे पथक पाठविले आहे.

पाळत ठेऊन केलेला प्रकार
दरम्यान, सदर घटना पाळत ठेऊन केलेली असल्याचे सुत्रांनी सांगितले. गॅस एजन्सीचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी बँकेत कधी जातात याची माहिती घेऊन त्यानंतर बरोबर त्याच वेळी एजन्सीच्या जवळ थांबणे व बॅग घेऊन पळणे हा पाळत ठेऊन केलेला प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...