आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्बो निवृत्ती:2700 पदे रिक्त; राज्याचे सिंचन व्यवस्थापन कोलमडण्याची भीती, 931 कर्मचारी एका दिवसात निवृत्त

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • दोन परीक्षेमुळे उमेदवार मुकले, ही कामे रखडणार

राज्याच्या  सिंचन विभागातील ९३१ कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त  जागांची संख्या २७०० च्या घरात गेली आहे. एकीकडे रिक्त जागांवर नवीन भरती नाही, तर अनेक जागांवर निवड होऊनही नियुक्त्या न दिल्यामुळे राज्याचे सिंचन व्यवस्थापन पार कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.

शासनाच्या विविध विभागात भरती बंद आहे, तर दुसरीकडे दरवर्षी सेवानिवृत्तांची संख्या वाढत चालली आहे. दरवर्षी ९ ते १० टक्के अभियंते, कर्मचारी निवृत्त होतात. त्या तुलनेत ३ टक्के पदे भरण्यासाठीच परवानगी दिली जाते. जलसंपदा विभागातील ४७ टक्के पदे सध्या रिक्त आहेत. त्यातच एका दिवसातील जम्बो निवृत्तीमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे.

डोलारा कोसळणार

रिक्त पदे भरण्याचे शासनाचे धोरणच चुकीचे आहे. रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत ३० टक्के पदे दरवर्षी भरायला हवीत. आता मेगा निवृत्ती मुळे जलसंपदा विभागाचा डोलारा कोसळण्याची भीती आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी. निवड झालेल्यांना नियुक्ती द्यावी. -जयवंत गायकवाड, माजी राज्याध्यक्ष, महाराष्ट्र कनिष्ठ अभियंता संघटना

दोन परीक्षेमुळे उमेदवार मुकले :

रिक्त जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी २०१९ मध्ये जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची ७७४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्याच वेळी मुंबई महापालिकेने देखील अभियंत्यांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने उमेदवार दोनपैकी एका परीक्षेला मुकणार होते. ही बाब लक्षात घेवून महापालिकेला भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी देण्यात आली. तर जलसंपदा विभागाला परीक्षा पुढे ढकलाव्यात लागल्या. हा गोंधळ नसता झाला तर विभागाला ७७४ अभियंते मिळाले असते, अशी माहिती महाराष्ट्र कनिष्ठ अभियंता संघटनेचे माजी राज्याध्यक्ष जयवंत गायकवाड यांनी दिली.

निवड झाली, नियुक्त्या रखडल्या :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६ महिन्यांपूर्वी सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या (द्वितीय श्रेणी) ३२४ पदांसाठी परीक्षा घेतली. मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली. परंतु अद्यापही त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.

ही कामे रखडणार :

नवीन सिंचन प्रकल्प उभारणे, जुन्या धरणांची देखभाल- दुरुस्ती, कालव्यातून पाणी सोडणे. धरणातील पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकरी, उद्योग व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणीपट्टी वसूल करणे आदी कामे अभियंते व क्षेत्रीय स्तरांवरील कर्मचारी करतात. कर्मचारी नसल्याने ही कामे रखडण्याची शक्यता आहे.

९३१ कर्मचारी एका दिवसात निवृत्त

जलसंपदा विभागाने ३१ मे रोजी जम्बो निवृत्ती अनुभवली. एकाच दिवसात विभागातील ३ अधीक्षक अभियंता, १२ कार्यकारी अभियंता, ४७ उपविभागीय अभियंते, ७९ कनिष्ठ अभियंते, ३९ कालवा निरीक्षक व सिंचन सहायक, ७९ कनिष्ठ लिपिक, १९ वरिष्ठ लिपिक, ५७ चौकीदार व टपाली, ६७ शिपाई, १० वाहनचालक, ५ प्रयोगशाळा सहायक आणि ५१४ रोजंदारी कर्मचारी असे ९३१ कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्यामुळे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्यांसह रिक्त पदांची संख्या २,७०० च्या घरात गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...