आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राऊंड सर्वेक्षण:300 एकरची हिमायतबाग वाचवण्यास 97 टक्के नागरिकांचे समर्थन

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवस्तीत ३०० एकरांवरील जैवविविधतेने समृद्ध ४०० वर्षांचा पुरातन वारसा असलेली हिमायतबाग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील ४० एकरांवरील जैवविविधतेचे संवर्धन करून उर्वरित जागेवर महिला कृषी महाविद्यालय बांधण्याचा प्रस्ताव वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाने तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर येथे दररोज मॉर्निंग वॉकला येणाऱ्या शहरवासीयांचे म्हणणे दिव्य मराठीने जाणून घेतले असता ९७ टक्के नागरिकांनी जैवविविधतेचे संरक्षण व्हायला हवे या बाजूने कौल दिला आहे. तर वृक्षसंपदा उद्ध्वस्त न करता महिला कृषी महाविद्यालय बांधले जात असेल तर हरकत नाही, असे मत ३ टक्के नागरिकांनी मांडले. १२ मार्चला सकाळी ७.३० ते ८.३० या वेळात येथे फिरण्यासाठी आलेल्यांपैकी १५७ जण या सर्वेक्षणात सहभागी झाले.

जमीन दिसली की राजकारणी आणि बिल्डर्सची नजर, आम्ही हिमायतबाग वाचवू जिथे जमीन असते तेथे राजकारणी आणि बिल्डर्सची नजर जाते. हिमायतबाग त्यांची शिकार होऊ देणार नाही. पुरातत्त्व खाते, कृषी विद्यापीठ आणि महापालिका यांच्यात हिची जमीन विभागली गेल्याने याच्या जपणुकीबाबत एकमेकांकडे बोटं दाखवली जातात. प्रत्येकाने आधी सांगावे याची त्यांनी काय जपणूक केली? गेल्या १० वर्षांत येथील मोरांची संख्या कमी झाली. त्यांची शिकार झाल्याची शक्यता आहे. शुद्ध अन्न, पाणी याप्रमाणे शुद्ध हवा हा आम्हा नागरिकांचा हक्क आहे. त्यासाठी राजकर्ते काय करीत आहेत? - अॅड. राजगोपाल मालपाणी

कोणत्या कृषी महाविद्यालयाला २४० एकर लागतात? : चारशे वर्षांची दुर्मिळ वृक्षसंपदा, पक्ष्यांचा अधिवास, नहर ए अंबरी, शक्कर बावडी या साऱ्यासह या ३०० एकर हिमायतबागेचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. ४० एकरांचे संवर्धन करून उरलेल्या २६० एकरांवर महिला कृषी महाविद्यालय बांधण्याचे सरकारचे प्रयोजन आहे, तर २६० एकरांवर कोणते महाविद्यालय बांधणार आणि त्यासाठी एवढी जैवविविधता उद्ध्वस्त का करायची आहे? याचा तपशील द्यावा. - मेघना बडजादे

हिमायतबाग वाचावी चारशे वर्षांचा हा वारसा सांगितला जातो. याच्या सीमा निश्चित नाही, अतिक्रमणे वाढत आहेत. अवैध धार्मिक स्थळांची बांधकामे होत आहेत. यावर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आले आहे. इथे महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झाले की ते अतिक्रमण कसे रोखणार? जैवविविधता कशी जपणार? - गुलबच्चनसिंग फौजी

...हा तर आरोग्याच्या प्रश्न शेकडो लोक येथे सकाळी येतात, व्यायाम करतात, शुद्ध हवेचा लाभ घेतात. हिमायतबागेचा ३०० एकर क्षेत्र संवर्धित राहाणे हा केवळ जमिनीचा प्रश्न नाही तर शहरवासीयांच्या आरोग्याच्या व जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महिला महाविद्यालय बांधण्यासाठी विद्यापीठाकडे शहरातच पर्यायी जमीन आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. - सुदाम सोनवणे, माजी महापौर

बातम्या आणखी आहेत...