आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडील व बहीण झाेपी गेल्याचे पाहून १७ वर्षीय सोहम नीरज नवलेने कार घराबाहेर काढली. जालना रस्त्यावरून सेव्हन हिल्सच्या दिशेने जात असताना कारचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचला. आकाशवाणी चौकात त्याचे नियंत्रण सुटल्याने कार ७० फूट घासत जात एसएफएसमोरील स्कायवॉकच्या पिलरवर जाऊन आदळली. कार पिलरमध्ये घुसल्याने अडकून चेंदामेंदा झाला. गुरुवारी मध्यरात्री २ वाजता झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या सोहमचा जागीच मृत्यू झाला. पोलिस, अग्निशमन विभागाला पिलरमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी दोन तास लागले. त्यानंतर लोखंडी रॉडने दरवाजा काढून त्याचा मृतदेह बाहेर काढावा लागला. सोहमने गुरुवारी दुपारी दहावीचा मराठीचा पेपर दिला हाेता.
गजानन मंदिर परिसरातील एस्सार पेट्रोल पंपाच्या मागील सुलोचना अपार्टमेंटमध्ये व्यावसायिक वडील व बहिणीसोबत राहणाऱ्या साेहमने सायंकाळी सर्वांसाेबत जेवण केले. नंतर तिघेही कॅनॉटला आइस्क्रीम खाण्यासाठी गेले. ११ वाजता घरी पोहोचल्यानंतर सर्वजण झोपले. मध्यरात्री साेहम गुपचूप चावी घेऊन बाहेर पडला. वडिलांची ह्युंदाई असेंट कार सुरू करून शहरात चक्कर मारण्यासाठी निघाला.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात, स्फोटासारखा आवाज आल्याने हादरलो
सोहमला चांगल्या रीतीने कार चालवता येत नव्हती तरीही त्याने ती घराबाहेर काढली. मोंढ्याकडून सरळ सेव्हन हिल्सच्या दिशेने भरधाव निघाला. आकाशवाणी चौकात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. तेथून एसएफएस शाळेपर्यंत कारचे चाक घासल्याचे व्रण रस्त्यावर उमटले. त्यामुळे कार जवळपास ७० फूट दुभाजकाच्या दिशेने घासत जात थेट दुभाजकावर चढली व नंतर स्कायवॉकच्या पिलरवर आदळली. ब्रेक घासत जात असताना आवाज आला तोच काही सेकंदांत स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रात्री वर्दळ कमी होती. घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जिन्सीच्या उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी धाव घेतली. कार अक्षरक्ष: पिलरमध्ये घुसल्याने दोन भागात कार फुटून पिलर डाव्या बाजूने सोहमपर्यंत आत घुसला होता. पाेलिस, अग्निशमनचे जवान व १३ जणांनी कारचा दरवाजा ओढून त्याला बाहेर काढले.
इकडे वडील, बहीण शहरात शोधत राहिले
सोहमच्या वडिलांना पहाटे तीन वाजता जाग आली तेव्हा ताे घरात नव्हता. ताे मोबाइल वापरत नसल्याने ते घाबरले व मुलीला सोबत घेऊन त्याच्या शोधात निघाले. चार वाजता त्यांना आकाशवाणी चौकातील अपघाताची माहिती कळल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा उपनिरीक्षक चव्हाण यांनी त्यांना सोहमची ओळख पटवण्यासाठी घाटीत बोलावले.
वडील, बहिणीला माेठा धक्का
कुटुंबाच्या माहितीनुसार, २०१६ मध्ये साेहमची आई व मामेभावाचा एसएफएस शाळेसमोर रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता. तेव्हा सोहम चौथीच्या वर्गात शिकत होता. त्यानंतर त्याला मोठी बहीण व वडिलांनी सांभाळले. मात्र, दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी त्याच परिसरात अपघाती मृत्यू झाल्याने वडील, बहिणीला धक्का बसला. जिन्सी पोलिस ठाण्यात त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून मृत सोहमवर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.