आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ५ मजली वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विद्यापीठाला दिला आहे. त्यामुळे आता बांधकाम कामाला गती मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापनेवेळी राज्य सरकारने विविध घोषणा केल्या होत्या. दोन वर्षांत विधी विद्यापीठाची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांनंतरही विद्यापीठाची उभारणी आणि विस्ताराची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. शिवाय विद्यापीठाने या विकासासाठी १०० कोटींचा निधी विद्यापीठाने स्वत:च उभारावा, असे ऑक्टोबरमध्ये सरकारने सांगितले होते. त्यावरून तदर्थ समन्वय समितीसह विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून नाराजी व्यक्त होताच सरकारने निर्णयाचे पत्र मागे घेतले होते.
त्यानंतर निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली. विद्यापीठाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १४९ कोटी रुपयांतून विविध इमारती उभारणीचे काम सुरु असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामधूनच आता दिलेला २० कोटींचा निधी वसतिगृह बांधकाम, विद्यार्थी व स्टाफ मेसच्या इमारत बांधकामासाठी दिला आहे. विद्यापीठात मुलांचे पाच व मुलींचे पाच मजली ३२८ खाेल्यांचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
अत्याधुनिक सुविधांवर भर एका वसतिगृहात ३२८ खोल्या आणि सेंटर ऑफ एक्सलन्स, भोजन कक्ष पूर्ण करण्यावर भर आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, पुढील शैक्षणिक वर्षात सुरू होणारे नवनवीन अभ्यासक्रमाचा विचार करत पायाभूत अत्याधुनिक सुविधांवर भर दिला जात आहे. औरंगाबादचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ २०१७ पासून सुरू झाले. या ५ वर्षांत पदवीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पीएचडी सुरू झाली.
डॉ. कराड यांच्या हस्ते होस्टेलचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रुसाअंतर्गत सव्वाआठ कोटी खर्च करून उभारलेल्या १२५ विद्यार्थी क्षमतेच्या नवीन वसतिगृहाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, पद्मश्री धनराज पिल्ले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी उभारलेले हे सहावे वसतिगृह आहे. शिवाय विद्यार्थी विश्रामगृह व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह (प्रत्येकी क्षमता ४०) देखील यापूर्वीच ते वापरात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची संख्या ८ झाली असून प्रवेश क्षमता सातशेवर गेली आहे, तर मुलींसाठी ७ वसतिगृहे कार्यरत असून प्रवेश क्षमता ९०० आहे. राज्य शासनाने रुसाअंतर्गत ६ कोटींचा निधी वसकिगृहासाठी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित खर्च विद्यापीठ निधीतून केला आहे. विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन, ग्रंथालय अशा अत्याधुनिक सुविधांसह ६३ खोल्या तयार आहेत. या ठिकाणी १२५ विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.