आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान सोडताना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सहायक मनोज सांडुजी नरवडे (५७) यास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली. विशेष म्हणजे ७४ हजार ६८२ रुपयांची रिकव्हरी रक्कम रद्द करण्यासाठी त्याने २० हजार रुपये मागून तक्रारदाराचे काम अडवून ठेवले होते.
विशेष म्हणजे नरवडे याच्या निवृत्तीलाही एक वर्षच बाकी आहे.शासकीय तंत्रनिकेतन येथून कार्यदेशक पदावरून ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार दिली होती. ते कुटुंबासह कोटला कॉलनी येथील शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. निवृत्तीनंतर त्यांनी निवासस्थान सोडले. मात्र, नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसे कळवून घर रिक्त केल्याचा रिपोर्ट व रिकव्हरी रक्कम असल्यास ती भरावी लागते.
त्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी तक्रारदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (वर्ग ३) मनोज नरवडे यांच्याकडे सातत्याने पुरवठा केला. परंतु रिपोर्ट पाठवल्याचा माेबदला व ७४ हजार रिकव्हरी न काढण्यासाठी नरवडेने २० हजार रुपये मागितले. त्याच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली.
खाडे यांच्या सूचनेवरून निरीक्षक हनुमंत वारे यांनी बुधवारी कार्यालयातच सापळा लावला. बुधवारी दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी ठरल्याप्रमाणे तक्रारदार कार्यालयात जाताच नरवडे २० हजार रुपयांपैकी १० हजार रुपये स्वीकारताना पकडला गेला. त्याला अटक करून पोलिस ठाण्यात आणले. वारे यांच्यासह अंमलदार साईनाथ तोडकर, अशोक नागरगोजे, सोमीनाथ थेटे यांनी कारवाई पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.