आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:नियंत्रण कक्षाला मोकळ्या जागेत मृतदेह पुरल्याचा कॉल; माती उकरल्यानंतर निघाला कुत्रा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पन्नालालनगरमध्ये मोकळ्या जागेत काहीतरी संशयास्पद हालचाल घडली आहे. अज्ञातांनी मृतदेह पुरला आहे, असा कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. पोलिसांची धावपळ सुरू झाली. शुक्रवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत माती उकरण्याचे ठरवण्यात आले. तब्बल दोन तास अथक परिश्रम घेतले. परंतु शेवटी खड्ड्यात कुत्रा पुरल्याचे समोर आले, तेव्हा सर्वांना क्षणभर अजय देवगणच्या “दृश्यम’ सिनेमाची आठवण झाली.

गुरुवारी सायंकाळी उशिरा उस्मानपुरा पोलिसांच्या डायल ११२ ला हा कॉल आला. त्यात पन्नालालनगर येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत काहीतरी संशयास्पदरीत्या पुरून ठेवल्याचे सांगण्यात आले. अंधार असल्याने पोलिसांनी शुक्रवारी पाहणी करण्याचे ठरवले. निरीक्षक गीता बागवडे यांनी पथकांच्या मदतीने आसपासच्या परिसरात विचारणा केली. मात्र, कुणीही काहीही सांगितले नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे ठरले. नियमानुसार, अशा वेळी तहसीलदारांच्या उपस्थितीत माती उकरावी लागते. बागवडे यांनी पत्र पाठवल्यानंतर नायब तहसीलदार योगिता खटावकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर पोलिस आले. बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर मजुरांना पाचारण करून उकरण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा खड्ड्यात कुणीतरी मृत कुत्रे पुरल्याचे समोर आले व सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. त्यानंतर घटनेचा सविस्तर पंचनामा करून नोंद घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...