आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कोविड वॉर्डमध्ये थांबून सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या चाळीस जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये नातेवाईकांसोबत थांबून सुपर स्प्रेडर करणाऱ्या चाळीस जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २४ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये १३ महिलांचाही समावेश आहे.

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये रुग्णां सोबत त्यांच्या नातेवाईकांनी थांबू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. सदर रुग्णांचे नातेवाईक दिवसभर थांबून त्यानंतर गावाकडे निघून जात होते. त्यामुळे त्यांच्याकडूनच कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या सुपर स्प्रेडरना आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णालयात थांबणाऱ्या नातेवाईकांना थेट विलीनीकरण कक्षात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही जिल्हाधिकारी जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सरप्राईज व्हिजिट मध्ये सुमारे ३५ पेक्षा अधिक नातेवाईक वार्ड व रुग्णालयाच्या परिसरात आढळून आले होते. त्या सर्वांना लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वीच एका रुग्णाच्या नातेवाईकाने विलीनीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यानंतर यापुढे रुग्णालय परिसर तसेच वार्ड मध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले.

दरम्यान सोमवारी ता. २४ रुग्णालयाच्या परिसरात व कोविड वार्ड मध्ये विविध रुग्णांचे ४० नातेवाईक आढळून आले. याप्रकरणी ग्रामसेवक सुभाष बागुल यांच्या तक्रारीवरून ४० जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. यामध्ये १३ महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. टाले पुढील तपास करीत आहेत.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस उपनिरीक्षक नितीन केणेकर यांच्या पथकाने रुग्णालयात भेट दिल्यानंतर हे नातेवाईक थांबल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व नातेवाईकांची नावे नोंदवून घेतली. आता यापुढे रुग्णालयात येऊ नका अन्यथा कडक कारवाई होईल अशा शब्दात तंबीही दिली.

बातम्या आणखी आहेत...