आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अघोरी कृत्य:जादूटोण्याच्या संशयावरून अपंग रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, आणखी दोघांना संपवायचे होते

करमाड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करमाड परिसरातील दर्ग्याजवळ घडली घटना, आरोपी अटकेत

जादूटोणा केल्याच्या संशयातून एकाने अपंग रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील करमाड शिवारात जालना रोडपासून अवघ्या ५० फुटांवर असलेल्या दर्गा परिसरात बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर आसाराम गडकर (वय ४८, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे खून झालेल्या अपंग व्यक्तीचे नाव आहे. करमाड पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब सदू शेजवळ यास अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चिकलठाणा येथील रहिवासी तथा रिक्षाचालक ज्ञानेश्वर गडकर हा एका पायाने अपंग असून ऑटोरिक्षा चालवत असे. तो नेहमी करमाड शिवारातील दर्ग्यात दर्शनासाठी जात होता. याच दर्ग्यात कुंभेफळ येथील भाऊसाहेब सदू शेजवळ हासुद्धा नियमितपणे येत होता. मंगळवारी (दि. २७) ज्ञानेश्वर गडकर दर्शनासाठी गेला होता. तेव्हा तेथे भाऊसाहेब शेजवळ हाही होता. बुधवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता ज्ञानेश्वर दर्ग्यात दर्शनासाठी गेला होता. दर्ग्यात माथा ठेकवल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास तो बाहेर येऊन बसला. त्याच वेळी भाऊसाहेब शेजवळ हाही बाहेर बसलेला होता. भाऊसाहेब यास अंगाची आग होण्याचा आजार आहे. मात्र हा आजार नव्हे तर ज्ञानेश्वर गडकर याने आपल्यावर जादूटोणा केल्याचा त्याला संशय आला.

या संशयातूनच ज्ञानेश्वर गडकर याच्याशी त्याने वाद घालून मारहाण सुरू केली. त्याने ज्ञानेशवरची कुबडी हिसकावून कुबडीने जबर मारहाण केली. कुबडी तुटल्यानंतर त्याने बाजूचा दगड उचलून ज्ञानेश्वर याला ठेचले. यात तो गंभीर जखमी हाेऊन रक्ताच्या थाराेळ्यात पडला. ही घटना जालना रोडपासून ५० फुटांवरच घडत होती.

एका व्यक्तीने पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे सुतळे व आदिनाथ उकर्डे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहताच भाऊसाहेब शेजवळ याने पळ काढला. मात्र सुतळे यांनी वाहनातून उतरून त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्यास पकडले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील गडकर यास घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केले. ही घटना समजताच करमाड ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, सापोनि प्रशांत पाटील हेही घटनास्थळी दाखल झाले.

करमाड परिसरात दहशत

दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेने करमाड परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील पोलिस उपाधीक्षक गणेश गावडे, अपर पोलिस अधीक्षक, विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.नी. संतोष खेतमाळस, सपोनि प्रशांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे हे करत आहेत. गुन्ह्याची उकल करण्यासाठी सुनील गोरे, आवेज शेख, विजयसिंग जारवाल, नामदेव धोंडकर यांनी सहकार्य केले.

आणखी दोघांना संपवायचे होते

रिक्षाचालक ज्ञानेश्वर गडकर याचा खून करणाऱ्या भाऊसाहेब शेजवळ यास पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्याने ज्ञानेश्वर यानेच आपल्यावर जादुटाेणा केल्याने त्याचा खून केला, अशी कबुली दिली. शिवाय जादूटोणा करणाऱ्या आणखी दोघांना संपवायचे हाेते, असेही ताे पाेलिसांना सांगत असल्याचे पाेलिस निरीक्षक संताेष खेतमाळस यांनी सांगितले. मृत ज्ञानेश्वर गडकर.

बातम्या आणखी आहेत...