आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची धावपळ:मुंबईत सीएसटी, दादर, कुर्ल्यामध्ये येऊन हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या रांजणगावातील मद्यपीची तुरुंगात रवानगी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हॅलो, मुंबई कंट्रोल रूम, भारतातले हिंदू संपत चालले आहेत. आता आम्ही मुंबईत सीएसटी, दादर व कुर्ल्यामध्ये येऊन हल्ले करणार आहोत. घोडबंदरमार्गे मुंबईत येऊ,’ या कॉलने मंगळवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांपासून औरंगाबाद पाेलिसांपर्यंत सर्वांचीच झोप उडाली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रात्रीतून शोध सुरू करत पंजाब शिवानंद थोरवे (३३, रा. रांजणगाव) याला अटक केली. थोरवेने नशेत केलेली चूक त्याला थेट तुरुंगात घेऊन गेली.

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात रात्री नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. रात्रपाळीवरचे कर्मचारी गस्तीसाठी रवाना होत होते. तितक्यात डायल ११२ वरील कर्मचाऱ्यांना ११ वाजून १३ मिनिटांनी संदेश मिळाला. वाळूज एमआयडीसीतील दत्ता रुग्णालयाजवळून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल आला असून त्याने मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी सतर्क झाले. ते मुंबई पोलिस विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिरमे यांनी तत्काळ सर्वांना रवाना होण्याचे आदेश दिले. तोपर्यंत नियंत्रण कक्षाला ज्या क्रमांकावरून कॉल केला होता तो मात्र बंद झाला होता. मुंबईच्या गुन्हे शाखेने काॅल करणाऱ्याचा दुसरा क्रमांक पाठवला. त्यानंतर पोलिसांनी तिकडे धाव घेतली.

७ मिनिटांचा कॉल, झोपेतून उठवून पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या पत्त्यावरील घर गाठले असता तो रामेश्वर बागडे यांचा असल्याचे समाेर आले. त्यांनी हा क्रमांक थोरवेकडे असून त्याने महिनाभरापूर्वी घर सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी नंतर शोध घेत थाेरवेचे रांजणगावमधील घर गाठले. त्याला झोपेतून उठवत त्याचा मोबाइल ताब्यात घेत त्याला ठाण्यात नेले. त्याच्या मोबाइलमध्ये ९ वाजून ५० मिनिटांनी ११२ क्रमांकावर कॉल केल्याचे आढळले. तब्बल ७ मिनिटे ८ सेकंद पोलिसांना कॉल करून तो हल्ल्याची धमकी देत होता.

पत्नीच्या तक्रारीवरून आयटी कायद्यांतर्गत दाखल आहे गुन्हा निरीक्षक संदीप गिरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे आधी चालक होता. पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन वर्षांपासून पत्नी, मुले त्याच्यासोबत राहत नाहीत. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...