आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेतला नाही म्हणून शेतकऱ्याची कुऱ्हाडीने हत्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅट्रॉसिटीचा दाखल गुन्हा मागे घेत नसल्याने जनार्दन कोंडिबा कसारे (५६, रा. साईनगर, पिसादेवी) या शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ते शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. गुरुवारी (१८ आॅगस्ट) दुपारी दोन वाजता ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी त्यांची पत्नी कलाबाई (५३) यांच्या तक्रारीवरून शिवाजी महादू औताडे, बाळू महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, भरत महादू औताडे, महादू गंगाराम औताडे (सर्व रा. हर्सूल) यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीस वर्षांपासून मृत कसारे पिसादेवी परिसरातील नऊ एकर गायरान जमिनीपैकी आठ एकर जमीन कसतात. उर्वरित एक एकर महादू गंगाराम औताडे यांच्या ताब्यात आहे. यावरून त्यांच्यात २००८ पासून वाद सुरू झाला. पहिल्या वादाच्या वेळी औताडे कुटुंबाने कसारेंच्या अंगावर धावून जात त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात कसारे यांच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ११ सप्टेंबर रोजी त्याची सुनावणी होती.

त्यामध्ये कसारे यांची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्याने औताडे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी गुन्हा मागे घेण्यासाठी कसारेंवर नव्याने दबाव टाकणे सुरू केले. पण ते नकार देत होते. गुरुवारी कसारे व त्यांची पत्नी शेतातील पहिल्या टप्प्याचे काम संपवून जेवण झाल्यावर आराम करत असतानाच शिवाजी औताडे तेथे गेला. तुला वारंवार समजावून सांगूनही अॅट्रॉसिटीची केस मागे का घेत नाही, लई मस्ती आली का? असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावर कसारेंनी न्यायालय देईल की खरा-खोटा निकाल, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या शिवाजीने शर्टात लपवलेली कुऱ्हाड काढून कसारेंच्या डोक्यात वार केला. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतरही आरोपीने त्यांना तसेच त्यांच्या पत्नी, नातवाला मारहाण केली आणि तो निघून गेला.

सामाजिक संघटना, ग्रामस्थांची घाटीत धाव
कसारेंना तत्काळ रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पिसादेवीच्या ग्रामस्थांनी आधी पोलिस ठाणे व नंतर घाटीत गर्दी केली. तणाव पाहता अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक बालाजी ढंगारे यांनी धाव घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कसारेंवर दरोड्याचा गुन्हा दाखल
कसारेंनी २००८ मध्ये औताडेंविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळीची तक्रार केली. त्यानंतर औताडेेंनी कसारेंवर दरोड्याची तक्रार दाखल केली. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने कसारे सुमारे तीन महिने तुरुंगात होते.

बातम्या आणखी आहेत...