आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औंढा नागनाथ जवळ पद्मावती शिवारामध्ये शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २० )पहाटे उघडकीस आली आहे. विहिरीच्या पाण्यावरून मयत शेतकरी रवी रुखमाजी वाठ (४२) यांचा खून झाला असावा अशी शक्यता औंढा नागनाथ पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील शेतकरी रवी रुखमाजी वाठ यांचे पद्मावती शिवारामध्ये साडे आठ एकर शेत आहे. सध्या शेतामध्ये हरभऱ्याचे पीक असून गव्हाच्या पेरणीची तयारी करण्याचे काम सुरू आहे. हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी तसेच गव्हाचे शेत तयार करण्यासाठी रवी वाठ हे गुरुवारी (ता. १९) रात्री अकरा वाजता एकटेच शेतात गेले होते. मात्र पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांचा भ्रमणध्वनी लागत नसल्यामुळे त्यांच्या मुलांना संशय आला. त्यामुळे त्यांची मुले शेतात गेले. यावेळी त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता विहिरीमध्ये रवी वाठ यांचा मृतदेह आढळला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस व नागरिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची तपासणी केली असता डोक्यावर वार केल्याचे आढळून आले. त्यांच्या डोक्यात शास्त्राचे पाच वार दिसून आले. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती काढण्यास सुरुवात केली जानेवारी २०१९ मध्ये रवी वाठ व त्यांचा भाऊ यांच्यात शेतातील विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू होता. त्यावेळी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज ही देण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यामुळे विहिरीच्या पाण्यावरून हा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यावरून पोलिसांनी शेतकरी रवी वाठ यांच्या भावाची चौकशी करण्याची तयारी चालवली आहे. पोलिसांनी याच्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो गुरुवारीच विदर्भात गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्यास तातडीने पोलिस ठाण्यात हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत . सध्यातरी पोलिसांनी विहिरीच्या पाण्याच्या वादातून खून झाला असावा अशी शक्यता गृहीत धरून तपास चालवला आहे मात्र संशयितांच्या चौकशीनंतरच पुढील बाब स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान मयत रवी वाठ यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.