आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजांची अनास्था:युवा महोत्सवाला ठेंगा देणाऱ्या 336 कॉलेजांकडून 10 हजारांचा दंड घेणार ; 5 दिवसांत भरावा लागेल दंड

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४१० संलग्नित महाविद्यालयांपैकी ३३६ महाविद्यालयांनी युवा महोत्सवात सहभाग घेतला नाही. त्याचे प्रमाण ५५.५६ आहे. याबाबत संबंधित महाविद्यालयांना १० हजार दंडाचा इशारा दिला होता. पण तरीही प्राचार्यांनी जुमानले नाही. म्हणून आता विद्यापीठाने ३३६ कॉलेजांना पुढील दोन दिवसांत नोटीस देण्याची तयारी केली आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विद्यापीठाचा युवा महोत्सव झाला. यात अधिकाधिक महाविद्यालंयानी सहभागी व्हावे, असा प्रयत्न विद्यापीठातर्फे करण्यात आला होता. सहभागी न होणाऱ्यांना १० हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय ११ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या बैठकीत घेतला होता. एका परिपत्रद्वारे प्रशासनाने इशारा दिला होता. तरीही विदारक चित्र समोर आले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार ४१० पैकी १८४ कॉलेजांनीच संघ पाठवले होते. त्यांच्या कलावंतांनी प्रत्यक्ष युवा महोत्सवात सहभाग घेतला. पण ६३ कॉलेज तर असे होते की, ज्यांनी फक्त नोंदणी केली. या कॉलेजचे संघ विद्यापीठात दाखल झालेच नाहीत. २७३ कॉलेजांनी नोंदणी तर सोडाच, विद्यापीठाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे.

त्यांनी एकाही इव्हेंटसाठी एकही कलावंत पाठवला नाही. अशा कॉलेजांवर आता कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. कॉलेजला टपालाद्वारे नोटीस पाठवली जाणार आहे. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांत दंड भरावा लागणार आहे. दहा हजारांच्या दंडाबरोबरच अकॅडमिक ऑडिटच्या वेळी या कॉलेजांचे ५ गुण कापून घेऊ, असे कुलगुरूंनी म्हटले होते. त्याविषयी अद्याप काहीच स्पष्टता आलेली नाहीये.

प्राचार्यांनी सकारात्मक होत स्वत:हून सहभाग घ्यायला हवा यासंदर्भात कुलगुरूंचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या निर्देशानुसारच दंडाच्या नोटिसा दोन दिवसांत पाठवू. भाग न घेतलेल्या कॉलेजांच्या नोटिसा तयार आहेत. खरंतर त्यांनी स्वयंस्फूर्त पणे सहभागी होणे अपेक्षित आहे. नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांतच दंड भरावा लागेल. -डॉ. संजय सांभाळकर, संचालक

बातम्या आणखी आहेत...