आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारकडून छाननी:रफिक झकेरिया युनिव्हर्सिटीच्या रूपाने शहरासाठी मिळू शकेल चौथे विद्यापीठ

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद शिक्षण संस्थेतील सर्व विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला असून तज्ज्ञ समितीने छाननीही केली आहे. काही महिन्यांत ‘झकेरिया प्रायव्हेट युनिव्हर्सिटी’ला राज्य सरकार हिरवा कंदील दाखवण्याची दाट शक्यता आहे. यास मान्यता मिळाली तर हे दुसरे खासगी विद्यापीठ, तर शहरातील चौथे असेल. मात्र, अनुदानितसाठी मौलाना आझाद कॉलेज सुरूच राहणार आहे.

डॉ. रफिक झकेरिया यांनी १९६३ मध्ये मौलाना आझाद शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर पत्नी पद्मश्री डॉ. फातेमा झकेरिया यांनी संस्थेचा विकास केला. सर्व विना अनुदानित अभ्यासक्रमांना एकत्र करून आझाद कॅम्पसमध्ये ‘झकेरिया युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. ही युनिव्हर्सिटी पूर्णपणे स्वयंअर्थसाहाय्यित राहणार असून ‘एमजीएम’नंतर दुसरे खासगी विद्यापीठ असेल. बीबीए, बीसीए, बीसीएस, हॉस्पिटल टुरिझम, टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट, विना अनुदानित एमएस्सी, एमकॉम, एमए, बीफार्मसी, एमफार्मसी हे विना अनुदानित अभ्यासक्रम खासगी विद्यापीठाचा भाग असतील. शिवाय कौशल्यावर आधारित असलेल्या नव्या अभ्यासक्रमांचीदेखील रचना केली जाईल. ‘प्रोसेस सुरू आहे, पण अद्याप काहीच सांगायचे नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व जाहीर करू.’ असे संस्थेचे अध्यक्ष फरहत जमाल यांनी सांगितले.

संस्थेचे मराठवाडा एज्युकेशन सोसायटी संचालित अध्यापक महाविद्यालय आहे. येथील कोर्सेस अनुदानित आहेत. या संस्थेचे अस्तित्व अबाधित राहिल. पूर्वीचे नवखंडा, तर आताचे डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन्सलाही अनुदान आहे. शिवाय संस्थेतील एमए आणि बीए, बीएस्सी, एमस्सीसह अनुदानित कोर्सेस मौलाना आझाद शिक्षण संस्थेमार्फत जैसे थे स्थितीत चालतील.

६१ वर्षांत शहरात झाली तीन विद्यापीठे, त्यात एक खासगी मराठवाड्यात २३ ऑगस्ट १९५८ रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. २०१४ दरम्यान तत्कालीन राज्य सरकारने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा कायदा संमत केला. १६ मार्च २०१७ पासून विधी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने स्थापन झाले. त्यानंतर मराठवाड्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून एमजीएम युनिव्हर्सिटीला २०१९ मध्ये मान मिळाला. आता रफिक झकेरिया युनिव्हर्सिटी झाले तर ६१ वर्षांतील हे चौथे विद्यापीठ असेल.

असे आहेत फायदे 1 सर्व अभ्यासक्रमांचा सिलॅबस ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळेल. 2 परीक्षा पद्धती, वेळापत्रक, निकाल लावण्याचे स्वातंत्र्य. 3 बाह्यशक्तीच्या अनाठायी हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळेल. 4 स्वयंअर्थसाहाय्यित असल्यामुळे शैक्षणिक, परीक्षा शुल्क ठरवण्याचे अधिकार मिळतील. 5 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना त्यांचे वेतन ठरवण्याची मुभा असेल. 6 कौशल्यावर आधारित पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम ठरवताना उद्योगांशी सामंजस्य करार करता येतील.

बातम्या आणखी आहेत...