आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा५० रुपयांचे पेट्रोल भरल्यावरही पेट्रोल भरलेच नाही, असे म्हणत सेव्हन हिल्स येथील जागृत पंपावरील कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांना २० जणांच्या टोळक्याने बुधवारी (४ मे) रात्री बेदम मारहाण केली. चाकूहल्ला केला. ४५ मिनिटे ही टोळी हैदोस घालत होती. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी टोळक्यावर कारवाईऐवजी पंपाच्या कर्मचाऱ्यांना धमकावले. वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनाही ‘तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी देत ठाण्यात नेले. दरम्यान, थेट पोलिस आयुक्तांनी आदेश दिल्यावर शेख अफसर शेख रज्जाक (२४), सुलेमान बबन पटेल (५५) यांना अटक झाली. तर,अबरार मकसूद पटेल, जमील सुलेमान शेख, तौफिक शेख, शेख शाहरुख वजीर शेख, साेहेल शेख अयुब शेख, शोएब मोहंमद शरीफ खान, अनू शेख ऊर्फ रायडर, शेख शाहिद आदी प्रमुख हल्लेखोर फरार झाले.
पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९.२० वाजता (एमएच २० डिझेल ३६६०) ट्रिपल सीट आलेल्या तरुणांच्या पॅशन दुचाकीत योगेश प्रेमसिंग छापुलेने (२५) ५० रुपयांचे पेट्रोल टाकले. तरीही पेट्रोल टाकलेच नाही, असे म्हणत योगेशला शिवीगाळ, मारहाण करून ते तरुण गेले. १५ मिनिटांनी ५ जणांना घेऊन आले आणि पुन्हा मारून गेले. याची माहिती मिळताच योगेशचा भाऊ, आईवडील, मित्र अभिजित भराड, प्रतीक पायमोडे पंपावर आले. १०.४५ वाजता २० जणांच्या टोळक्याने योगेश व इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. एकाने योगेशच्या गळ्यावर चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण पंप व्यवस्थापकांनी प्रसंगावधान राखल्याने तो वाचला. हल्लेखोरांनी योगेशच्या आईवरही फायटरने वार केले आणि ते फरार झाले. एकूण सात जण जखमी झाले.
पंपावर हल्ला होऊन चोवीस तास उलटले, पण पुंडलिकनगर पोलिसांनी २० पैकी दोघांना पकडले. एका अल्पवयीन हल्लेखोराची समजूत घालून सोडून दिले. पुंडलिकनगरमध्ये गुंडांच्या अनेक टोळ्या असून त्या व्यावसायिकांना धमकावतात. खंडणी वसुली करतात. केवळ गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या डीबी पथकाला मात्र त्याचे कुठलेही गांभीर्य उरले नाही. वरिष्ठही त्यांच्याकडे डोळेझाक करतात. म्हणूनच डीबी पथकातील कर्मचारी गुंडांऐवजी सामान्य लोक, पत्रकारांच्या अंगावर धावून जातात. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आटापिटा करतात, अशी पोलिस दलात चर्चा आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
पंपावर उशिरा आलेल्या पोलिसांनी ‘दिव्य मराठी’चे पत्रकार नितीश गोवंडे, ‘पुढारी’चे गणेश खेडकरांशी अरेरावी केली. सरकारी कामात हस्तक्षेपाचे खोटे गुन्हे दाखल करतो, अशी धमकी देत ठाण्यात नेले. पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी डीबी पथकातील संतोष पारधे, नीलेश शिंदे यांची चौकशी सुरू केली. त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.