आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:पाठिंब्याबद्दल जनतेचे मनस्वी आभार, आता विकासासाठी कठोर परिश्रम; परभणीच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची ग्वाही

परभणी2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गोयल यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अखेर गुरुवारी पदभार स्वीकारला. स्वागत, कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता बाजूला सारत त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. राज्यपालांचा शुक्रवारी परभणी दौरा असल्याने विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत पत्रकारांशी संवाद साधला. पाठिंब्याबद्दल जनतेचे आभार मानून जिल्ह्याचा अभ्यास करत कठोर परिश्रम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

राजकीय दबावापोटी त्यांना आधी पदभार न घेता मुंबईत जावे लागले होते. पण जागरूक नागरिकांनी याविरुद्ध आंदोलन केल्यानंतर गोयल यांचीच जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी सकाळी त्या देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईहून परभणीत दाखल झाल्या. सकाळी कार्यालयात न येता राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाऊन पाहणी केली. दुपारी दीड वाजता त्या कार्यालयात आल्या.

मोजकेच अधिकारी व कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. या वेळी पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, प्राचार्य डी. एन.गोखले आदी उपस्थित होते.

कोण आहेत आंचल गोयल

 • जन्म : १ जुलै १९९० रोजी पंजाब राज्यात जन्म झाला.
 • शिक्षण : २०१२ मध्ये चंदीगड येथे बीई इलेक्ट्रॉनिक्सची पदवी मिळवली.
 • २०१३ मध्ये आयकर विभागात निवड झाली.
 • आई-वडील बँकिंग क्षेत्रात कार्यरत. पती निमित गोयल २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी.
 • २०१४ मध्ये आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र केडर मिळाले.
 • २०१५-१६ मध्ये परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केला.
 • केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नॅचरल गॅस विभागात सहायक सचिव म्हणून काम.
 • २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती.
 • मे २०१८ पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत १८ महिने मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी.
 • त्यानंतर सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत.

जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष काम
पदभारावरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर विचारले असता त्यांनी भाष्य करणे टाळले. नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मात्र मानले. मराठवाड्यात आपण नवीन असल्याने परभणी जिल्ह्याचा अभ्यास करून कामाचा प्राधान्यक्रम ठरवणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात कृषी क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्न आहेत, त्यावरही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...