आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंधवाचन:प्रतिकूलतेतही यश मिळवणारा नायक ‘भुरा’ तरुणांचे आकर्षण ; कौस्तुभ पटाईत यांचा सूर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद बाविस्कर लिखित ‘भुरा’ आत्मकथन तरुणाईत सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे. हे पुस्तक व्यवस्थेवर भाष्य करीत असले तरी ठोस उपाय सुचवत नाही. या लेखनात आत्मलुब्धता असली तरी निरपेक्षता आहे. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळणारा नायक म्हणून तरुणांना पुस्तक आकर्षित करते, असा सूर निबंधवाचन उपक्रमात सहभागींनी व्यक्त केला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात निबंधवाचन उपक्रमात ‘भुरा’ आत्मकथनावर चर्चा केली. नम्रता फलके, कौस्तुभ पटाईत यांनी निबंधवाचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. मसापतर्फे दर महिन्याला चर्चेतील पुस्तकावर हा कार्यक्रम होत आहे.

स्त्री व्यक्तिरेखांना दुय्यम स्थान दिले : नम्रता फलके ‘भुरा’ आत्मकथन शैक्षणिक प्रवासाची म्हणजेच खान्देशातील खेडे ते ‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास आहे. लेखक प्रतिकूलतेत प्रयत्नांची पराकाष्ठा करून परिस्थिती बदलणारा आहे. भुरा व्यवस्थेतील दोष सांगतो, पण उपाय सांगत नाही. गावातील जातव्यवस्था सांगण्याची संधी त्यांनी टाळली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकथनात आई व इतर स्त्री व्यक्तिरेखांना दुय्यम दर्जा दिला आहे.

स्वत:ची भूमिका सांगण्यात ऊर्जा वाया : कौस्तुभ पटाईत स्वत:ची भूमिका सांगण्यात लेखकाने ऊर्जा वाया घालवली आहे. २०१४ नंतर ‘जेएनयू’ चर्चेत असल्याने बुद्धिजीवी वर्गाने ‘भुरा’ उचलून धरले. त्यातून पुस्तकाच्या वाट्याला कौतुक आले. भुरा आत्मकथेच्या वैचारिकतेपेक्षा त्याच्या वाङ्मयीन उपलब्धतेची अधिक चर्चा झाली. पुस्तक तरुणांमध्ये लोकप्रिय असले तरी ते इतर यशोगाथांपेक्षा वेगळे आहे. पहिल्याच प्रयत्नात पुस्तकाच्या आठ हजार प्रती खपल्या आहेत.

आत्मलुब्ध पण निरपेक्षतावादी लेखक : प्रा. जयदेव डोळे ‘भुरा’ आत्मकथन आत्मकेंद्री नायकाचे कथन आहे. तो स्वत:ला व्यवस्थेत सतत बाहेरचा असल्याचे बिंबवतो. लेखक कुणामध्येही गुंतत नाही. आधुनिकतेविषयीची तुच्छता यामध्ये दिसते. अराजकीय आहे. लेखक आत्मलुब्ध आणि आत्मनिष्ठ दिसतो. या मांडणीला त्याने अतिरिक्त तत्त्वज्ञानाचा आधार दिला आहे. तरीसुद्धा निरीश्वरवादी, निधर्मी आणि निरपेक्ष आत्मकथन म्हणून त्याकडे पाहता येईल, असे प्रा. डोळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...