आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:​​​​​​​नेदरलँडहून बियाणे मागवून उच्चशिक्षित युवतीने घेतले रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिकिलो मिळतोय 100 रुपये भाव, लातूर-बीडच्या बाजारपेठांतून मागणी वाढली, तीन महिलांना रोजगार

पारंपरिक शेती करताना शेतीत नवीन प्रयोग म्हणून सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथील एका उच्चशिक्षित युवतीने नेदरलँड येथून रंगीत सिमला मिरचीचे बियाणे मागवून शेतातील १० गुंठ्यात उभारलेल्या पॉलिहाऊसमध्ये २५०० रोपांची निर्मिती करून उत्पादन घेतले. लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स बंद असल्याने महानगरात उत्पादित माल पाठवता आला नाही. अाता स्थानिक बाजारपेठेत रंगीत सिमला मिरची विक्रीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून सध्या जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठसह लातूर, बीड अादी परजिल्ह्यांतील बाजारपेठांतून मागणी वाढली आहे. या मिरचीला प्रतिकिलाे १०० रुपये भाव मिळत अाहे.

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथील विष्णुपंत देशपांडे यांची गावालगतच ६ एकर शेती आहे. देशपांडे हे कापूस, सोयाबीन हे पीक घेतात. २०२० मध्ये कृषी विभागाच्या योजनेतून त्यांनी पॉलिहाऊस उभारले. शेतीत नवीन प्रयोग म्हणून देशपांडे कुटुंबीयांचा या पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेती करण्याचा विचार होता. परंतु गतवर्षी लॉकडाऊनमुळे त्यांनी गुलाबाची शेती केली नाही. या कालावधीतच विष्णुपंत देशपांडे यांचा मुलगा वैभव व मुलगी वैष्णवी यांनी या पॉलिहाऊसमध्ये रंगीत सिमला मिरचीची शेती करण्याचे ठरवले. वैभव यांची पॉलिहाऊस उभारणीची कंपनी आहे. वैष्णवी हिने मराठी व इतिहास विषयात एमए केले आहे. तसेच तिला नृत्य व अभिनयाची आवड आहे.

रंगीत सिमला मिरचीला महानगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठी मागणी असल्याने पारंपरिक शेतीबरोबर सिमला मिरचीची शेती करण्याचा विचार वैष्णवीने केला. त्यासाठी वैष्णवी व वैभव यांनी नेदरलँड येथून रंगीत सिमला मिरचीचे बियाणे मागवले. वैष्णवीच्या या प्रयत्नाला वडील विष्णुपंत, आई विजयालक्ष्मी, भाऊ वैभव व वेदांत यांची साथ मिळाली. १० गुंठ्यातील पॉलिहाऊसमध्ये डिसेंबर महिन्यात २ हजार ५०० रोपे वाढवण्यासाठी प्रयत्न केले. या शेतीच्या माध्यमातून तीन ते चार महिलांना रोजगारदेखील मिळाला. पॉलिहाऊसमध्ये वाफे तयार करून कोको पीटमध्ये रोपे तयार करणे, रोपे लावणे, ड्रीप अंथरणे, झाडांची छाटणी करणे, बांधणी ही सगळी कामे महिलांच्या मदतीने तसेच स्वतः वैष्णवीने केली.

परिस्थितीचा जिद्दीने सामना
लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद झाल्या, वाहतूक बंद झाली. वैष्णवीने खचून न जाता मिरची स्थानिक बाजारात विक्री करण्याचे ठरवले. सिमला मिरची रंगाबाबत माहीत नसल्याने ग्राहक ही मिरची पिकली असे समजून घेत नव्हते. त्यामुळे वैष्णवी हिने सिमला मिरची तोडून तिचे व्यवस्थित पॅकेजिंग करून परिचित, मित्र, नातेवाइक, महाविद्यालयातील शिक्षक, कोरोनाकाळात काम करणारे पोलिस, आरोग्यसेवक, कार्यालयीन कर्मचारी यांना मिरची भेट दिली. तसेच मिरचीचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे याबाबत माहिती दिली. यामुळे रंगीत सिमला मिरचीची मागणी वाढली. स्थानिक बाजारपेठेसह परभणी, परळी, बीड, लातूर येथे विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे. १०० रुपये किलोप्रमाणे सिमला मिरचीची विक्री केली जात आहे.

भाजीपाला लागवडीचा विचार
रंगीत सिमला मिरचीस स्थानिक बाजारपेठ मिळाली आहे. पॉलिहाऊसमध्ये स्थानिक बाजारपेठेत मागणी असलेला भाजीपाला घेण्याचा विचार आहे. जैविक खताचा वापर करून भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन स्थानिक बाजारपेठेत आपल्या फार्मच्या नावाने विषमुक्त भाजीपाल्याचा ब्रँड तयार करायचा आहे. तसेच बांबूचे उत्पादन घेण्याचाही विचार सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात संकट, अडचणी येत असताना त्या संकटाचा धैर्याने व जिद्दीने सामना करणे आवश्यक आहे. शेतीत नुकसान नाही. स्वतः शेतीकडे लक्ष देऊन मेहनत केल्यास निश्‍चित यश मिळते.- वैष्णवी देशपांडे

बातम्या आणखी आहेत...