आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगेहाथ अटक:पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून मजुराने दिली पोलिसाला लाच

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराेनाकाळात थकलेल्या हप्त्यांमुळे फायनान्स कंपनीने दुचाकी ओढून नेली. इतर हप्ते वेळेवर भरलेले असल्याने मजुराने गोडाऊनवर जाऊन दुचाकी देण्याची विनंती केली. मात्र, त्याला मारहाण करून हाकलून लावले. मजुराने उस्मानपुरा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिस नाईक प्रकाश धोंडिबा सोनवणे (४९) याने दुचाकी सोडवण्यासाठी साडेसात हजार रुपये मागितले. हे पैसे नसल्याने त्याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे आणून दिले. नंतर आणखी पाच हजार रुपये मागितले. त्यामुळे मजुराने एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून ठाण्याजवळील टपरीमध्ये गुरुवारी दुपारी सोनवणेला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

४० वर्षीय तक्रारदार मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी बजाज फायनान्सकडून कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली. कोरोनाकाळात उत्पन्न बंद झाल्याने त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपयांचे तीन हप्ते थकले. उर्वरित सर्व हप्ते त्यांनी भरले होते. मात्र, त्या तीन हप्त्यांमुळे कंपनीने त्यांची दुचाकी ओढून नेली.

दुचाकी जमा असलेल्या गोडाऊनवर जाऊन त्यांनी दुचाकी परत करण्याची विनंती केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी नाशिकला जा, मुंबईला जा, असे सांगत मारहाण करून हाकलून लावले. त्यामुळे त्यांनी उस्मानपुरा पोलिसांकडे तक्रार केली होती. विशेष म्हणजे, दुचाकी जप्त करताना त्यांना कुठलीही नोटीस दिली नसल्याचा दावा त्यांनी केला.

आजारी असूनही पैसे मागितले
तक्रारदार आजारी पडल्याने रुग्णालयात भरती होते. हे माहिती असूनही सोनवणे लाचेची मागणी करत हाेता. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पथकाने २४ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. सोनवणेने पैशांसाठी तक्रारदाराला ठाण्याजवळील चहाच्या टपरीवर बोलावले. वर्दीवर साधा शर्ट परिधान करून तो टपरीवर आला. क्षीरसागर यांच्या पथकाने सापळा रचला. पैसे स्वीकारताच पथकाने सोनवणेला रंगेहाथ पकडले.

पैसे घेण्यासाठी सराफाच्या दुकानावर येऊन थांबला
उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक सोनवणे याच्याकडे अर्ज तपासासाठी आला होता. सोनवणेने त्यांना अर्जावर कारवाई करण्यासाठी व दुचाकी परत मिळवून देतो म्हणून आधी अडीच व नंतर साडेतीन हजार रुपये मागितले. पैसे नसल्याने तक्रारदाराने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले. ते पैसे घेण्यासाठी सोनवणे सराफाच्या दुकानातच उभा राहिला. मात्र, पैसे घेऊनही सोनवणेने कारवाई केली नाही.

त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार संतापला. त्याने थेट त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या आदेशावरून निरीक्षक संदीप क्षीरसागर यांनी १७ नोव्हेंबर रोजी तक्रारीची खातरजमा केली. १८ नोव्हेंबर रोजी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...