आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगलट:मोबाइल हरवून बसलेल्या वकिलाने रचला लुटल्याचा बनाव; पितळ उघडे, मौजमजा करणे अंगलट; खोट्या तक्रारीमुळे पोलिस, गुन्हे शाखेची धावाधाव

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत मौजमजेसाठी एका महिलेला भेटायला गेल्यानंतर दोन मित्र मोबाइल हरवून बसले. मात्र ‘तिकडे’ गेल्याची वाच्यता झाल्यास बदनामी होईल म्हणून त्यापैकी एकाने मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार दिली, तर दुसऱ्या वकील तरुणाने दोन लुटारूंनी रस्त्यात अडवून मारहाण करत आपल्याकडील मोबाइल, १६ हजार रोख, बार कौन्सिलच्या ओळखपत्रासह पाकीट लुटल्याची फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावला. मात्र पोलिस व गुन्हे शाखेने सखोल तपास केल्यानंतर वकिलाचे पितळ उघडे पडले. आता वकिलाने खोटी फिर्याद दिल्याचा अहवाल गुन्हे शाखेने सादर केला आहे.

हर्सूल परिसरातील सहारा परिवर्तन येथे राहणारे विनोद संजय आठवले (२८) हे हायकोर्टात वकिली करतात. २० मार्च रोजी त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची भेट घेऊन आपल्याला लुटल्याची तक्रार दिली. आपण दुचाकीवरून (एमएच २० एफक्यू २८७०) न्यायालयाच्या कामानिमित्त बायपासमार्गे सायंकाळी साडेसहा वाजता बीडला जात होतो. बाळापूर फाटा पीबी इस्टेटजवळ दोन जणांनी आपल्याला अडवले व धमकी देऊन मोबाइल व पाकीट चोरून नेले. पाकिटात सोळा हजार रुपये, बार कौन्सिलचे ओळखपत्र व ड्रायव्हिंग लायसन्स होते, असे आठवलेने तक्रारीत नमूद केले.

खरे वाटावे असे रचले कथानक
आठवले यांनी लुटीच्या घटनेचे विश्वास बसावे इतके सविस्तर वर्णन केले. लुटणाऱ्या दोन जणांपैकी एक जाड तर एक बारीक होता. त्यांचे कपड्यांचे रंग, डिझाइन, पायातले बूट, जॅकेट, जॅकेटची चेन लावलेली नव्हती. जाड मनुष्य गुटखा खात माझ्याकडे आला. लूटमार करून जाताना काळ्या रंगाची दुचाकी गाडीवर बसून एकाने ‘भूषण चल पटकन’ असे म्हणून दोघे झाल्टा फाट्याच्या दिशेने पळाले. दुचाकीला नंबर प्लेट नव्हती तसेच प्लेटखाली मडगार्डवर महापुरुषाचा फोटो होता, इतका प्रसंग रंगवून त्यांनी पोलिसांना सांगितला होता.

सायंकाळच्या लुटीने पोलिसही चक्रावले
बीड बायपासवर सर्वाधिक वर्दळ असताना भरसायंकाळी लूटमार झाल्याचे कळल्याने पोलिसही चक्रावून गेले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी तपास सुरू केला. मात्र, आठवलेंनी सांगितलेल्या घटनाक्रमाबाबत शिंदे यांना संशय आला. वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सखोल वर्णन सांगत असताना आठवले व त्यांच्या मित्रांच्या सांगण्यात तफावत येत होती. चौकशी सुरू असताना आठवलेंनी मनोज शिंदे यांच्या पथकाला अचानक प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मित्रांना बोलावले. इतर चौघांची वेगवेगळी चौकशी केली असता सर्वांचीच माहिती वेगळी आली. त्यातून खोट्या तक्रारीचे पितळ उघडे पडले.

खोटी तक्रार देणाऱ्यांवर होणार कारवाई
आठवले पाच मित्रांसह १९ मार्च रोजी गेट क्रमांक ५६ जवळ गेले होते. इतर तिघे तेथून दारू पिण्यासाठी तर आठवले व एक जण पुढे राहणाऱ्या महिलेकडे गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र महिलेकडे गेल्यानंतर त्यांचे मोबाइल गहाळ झाले. आठवलेच्या मित्राने आंबेडकर चौकात मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार सिडको पोलिसात दिली, तर आठवलेने लूटमारीचा बनाव रचला. चौकशीत ही तक्रार खोटी असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेने हा अहवाल न्यायालयात सादर केला. आठवले यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे निरीक्षक पोटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...