आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांना कार्यमुक्त करा:औरंगाबादेतील तरुणाचे थेट राष्ट्रपतींना पत्र, अन्यथा राजभवनावर संतापाची लाट येण्याचा इशारा

संतोष देशमुख।औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत थोर महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करुन महाराष्ट्रातील ऐक्य, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विधानामुळे काही अघटित काही घडण्यापुर्वीच त्यांना कार्यमुक्त करावे, असे पत्र औरंगाबाद शहरातील तरुणाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे. संकेत सोळुंके असे तरुणाचे नाव आहे.

सातत्याने वादग्रस्त विधाने

पत्रात म्हटले आहे की, राज्यपाल हे महाराष्ट्राचे संविधानिक प्रमुख आहेत. मात्र, त्यांचे विधान चिंताजनक असतात. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग यांनी समर्थ नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते, असे चुकीचे विधान केले होते. यामुळे तीव्र पडसाद उमटले. यानंतर लगेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलताना ते घसरले. आता महाराष्ट्रात गुजराती व राजस्थानी आले नसते तर मुंबई आर्थिक राजधानी झाली नसती, असे विधान त्यांनी केले आहे. यामुळे सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटत आहेत.

पदाची शान राखावी

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना अशा प्रकारे महाराष्ट्राला कमी लेखणे संविधानिक प्रमुखांना शोभत नाही. सतत चुकीचे विधान करणे बरोबर नाही. त्यामुळे पुढे काही चुकीचे विधान करण्यापूर्वी व संतापाची लाट राजभवनावर पोहोचण्यापूर्वी त्यांना कार्यमुक्त करावे व राज्यपाल पदाची गरीमा राखावी.

बुलंद छावाची मागणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा बुलंद छावाने निषेध व्यक्त केला. संघटनेने म्हटले आहे की, मुंबई कष्टकऱ्यांच्या बळावर उभी आहे. गुजराथी, राजस्थान यांच्यासह परराज्यातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना मुंबईने भरभरून दिले आहे. म्हणून मुंबईला आर्थिक राजधानी बनण्याचा बहुमान मिळाला आहे. हे राज्यपालांना माहिती नाही. मनाला येईल ते बोलत आहेत. संविधानिक प्रमुखांना असे बोलणे अयोग्य असून शांतता, ऐक्यता भंग होण्यापूर्वी त्यांना हटवण्याची मागणी सुरेश वाकडे पाटील, सतीश वेताळ, मनोज गायके, ज्ञानेश्वर जाधव आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...